लंडन : यंदाच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी आर्सेनल विरुद्ध पॅरिस सेंट-जर्मेन (बुधवारी) आणि बार्सिलोना विरुद्ध इंटर मिलान (गुरुवारी) हे संघ मैदानात उतरतील तेव्हा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळेल यात शंका नाही. उपांत्य फेरीचे परतीचे सामने हे ७ व ८ मे रोजी होतील. तर, अंतिम सामना १ जूनला पार पडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंधरा वर्षांपूर्वी बार्सिलोना आणि इंटर मिलान यांच्यात सामना झाला होता. तेव्हा बार्सिलोनाचा आजचा प्रमुख खेळाडू लामिने यमाल तीन वर्षांचा होता आणि लिओनेल मेसी हा यशाच्या शिखराजवळ पोहचला होता. आता पुन्हा एकदा हे दोन संघ चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येत आहे. दोन्ही संघांतील गुणवत्ता सारखीच आणि दोघांचेही उद्दिष्ट विजयाचे त्यामुळे एक सर्वोत्तम सामना बघायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बार्सिलोना संघ २०१८-१९च्या हंगामानंतर प्रथमच चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहचला आहे. सर्वोत्तम आक्रमण हे या नव्या संघाचे वौशिष्ट्य असून, तीच त्यांची नवी ओळख बनली आहे. यमाल, राफिन्हा, लेवांडोवस्की असे प्रमुख आक्रमक सध्या चांगले भरात आहेत. बार्सिलोना संघाने आठ सामन्यांत २८ गोल केले आणि बाद फेरीत बेन्फिका व बोरुसिया डॉर्टमंड यांना नमवताना आणखी नऊ गोल केले.

बार्सिलोनाचा प्रतिस्पर्धी इंटर मिलानही तगडा संघ आहे. यंदाच्या स्पर्धेत पहिल्या टप्प्यात आठ सामन्यांपैकी त्यांनी केवळ एका सामन्यात पराभव पत्करला आहे. इंटरने यापूर्वी २०१० मध्ये बार्सिलोनालाच हरवून आपली आगेकूच कायम राखली आणि अंतिम सामन्यात बायर्न म्युनिकवर विजय मिळवून तिसरे विजेतेपद मिळवले होते. तीच कामगिरी आता या संघासाठी एक प्रेरक म्हणून मानली जात आहे.

पॅरिस सेंटजर्मेनचा कस

आर्सेनल आणि पॅरिस सेंट-जर्मेन हा सामना दोन नव्या संघातील वाटतो. हे दोन्ही संघ चॅम्पियन्स लीगमध्ये आतापर्यंत केवळ तीन वेळा एकमेकांसमोर आले आहेत. विशेष म्हणजे तीनही सामने साखळीतील होती. बाद फेरीत प्रथमच हे दोन संघ समोरासमोर येत आहेत. आर्सेनलने उपांत्यपूर्व फेरीत दोन्ही सामन्यांत रेयाल माद्रिदवर विजय मिळवून आपली चमक दाखवली आहे. हीच कामगिरी पुढे कायम राखण्यासाठी आर्सेनल निश्चित उत्सुक असेल. त्याच वेळी प्रतिस्पर्धी सेंट-जर्मेन संघ लागोपाठ दुसऱ्या इंग्लिश प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविण्यासाठी सज्ज आहे. उपांत्य फेरीपर्यंत सेंट-जर्मेनने लिव्हरपूल आणि अॅस्टन व्हिला या इंग्लिश संघांचे आव्हान परतवून लावले. आता ते आर्सेनलशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहेत. किलियन एम्बापे, नेमार, मेसी अशा दिग्गज खेळाडूंना सांभाळणारा हा संघ आता नव्या प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडूंसह पहिले चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन्ही संघांना प्रथमच युरोपियन चॅम्पियन बनण्याचा ध्यास आहे, त्यामुळे पुढे जाण्यासाठी दोन्ही संघ सर्वोत्तम प्रयत्न करतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arsenal vs paris saint germain semi finals champions league football zws