मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानचे खेळाडू साहिबझादा फरहान आणि हारिस राैफ यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार केली आहे. दुसरीकडे, आशिया चषक स्पर्धेतील साखळी सामन्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना संदेश देणाऱ्या भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरोधात पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) तक्रार नोंदवली आहे.

सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी दोन वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही वेळा खेळाडूंमध्ये बराच संघर्ष पाहायला मिळाला आहे. विशेषत: गेल्या रविवारी झालेल्या ‘अव्वल चार’ फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबझादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बॅटचा बंदुकीसारखा वापर करताना हवेत गोळ्या झाडल्याची कृती केली होती. त्यानंतर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीदरम्यान हारिस रौफने विमान पाडल्याचे हातवारे केले होते.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले होते. या वेळी पाकिस्तानी सैन्याने भारताची सहा राफेल विमाने पाडल्याचा दावा करण्यात आला होता. हेच रौफने आपल्या कृतीतून दाखविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रौफची भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशी शाब्दिक चकमकही झाली. रौफ आणि फरहान यांच्या या कृतीविरोधात ‘बीसीसीआय’ने ‘आयसीसी’कडे धाव घेतली आहे. दुसरीकडे, ‘पीसीबी’ने भारताचा कर्णधार सूर्यकुमार याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा साखळी सामना जिंकल्यानंतर पारितोषिक विरतणादरम्यान ‘आम्ही हा विजय भारताच्या सशस्त्र दलांना समर्पित करतो’ असे सूर्यकुमार म्हणाला होता. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असेही सूर्यकुमारने म्हटले होते. सूर्यकुमारने राजकीय विधान करून खेळाची प्रतिमा मलिन केल्याचा दावा ‘पीसीबी’ने केला आहे. सूर्यकुमार आपल्यावरील हे आरोप फेटाळणार असल्याचे समजते. या प्रकरणाची सुनावणीही होऊ शकते.