Suryakumar Yadav Match Fee Donation: यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारताने काल पाकिस्तानला नमवत जेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, तो या स्पर्धेतील आपली संपूर्ण मॅच फी भारतीय सशस्त्र दलांना आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यातील पीडितांना देणार आहे.

अंतिम सामन्यातील विजयानंतर सूर्यकुमार यादवने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मी या स्पर्धेतील माझी संपूर्ण मॅच फी आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. जय हिंद.”

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना टी-२० फॉरमॅटमध्ये प्रत्येक सामन्यासाठी ४ लाख रुपये मॅच फी मिळते. सूर्यकुमार या स्पर्धेत सात सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला मिळणार एकूण २८ लाख रुपयांची मॅच फी तो पहलगाम हल्ल्यातील पीडीत आणि सैन्यासाठी देणार आहे.

आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघ ४१ वर्षांत पहिल्यांदाच आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात भारतीय संघावर नेहमीच भारी पडतो हा इतिहास आहे. यावेळीही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.

पाकिस्तानने भारतीय संघाला विजयासाठी १४७ धावांचे आव्हान दिले होते. भारतीय संघाचा मजबूत फलंदाजीक्रम पाहता हे आव्हान फार मोठे नव्हते. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीलाच भारतीय संघाला मोठे धक्के दिले. पण तिलक वर्माने शेवटपर्यंत एक बाजू धरून ठेवली. आधी त्याला संजू सॅमसनची साथ मिळाली. त्यानंतर शिवम दुबेसोबत मिळून त्याने भारतीय संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवले. शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंगने चौकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. निवेदक सायमन डूल यांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय संघ ट्रॉफी स्वीकारणार नाही असे आशियाई क्रिकेट परिषदेने सूचित केल्यानंतर त्यांनी बक्षिस वितरण कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.