Suryakumar Yadav On Oman Cricket Team: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात दमदार विजय मिळवला. ओमानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने १८९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना ओमानच्या फलंदाजांनी पूर्ण जोर लावला. शेवटी ओमानचा संघ विजयापासून २१ धावा दूर राहिला. त्यामुळे ओमान संघाने ज्या पद्धतीने खेळ केला. त्याचं जोरदार कौतुक होत आहे. दरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील ओमान संघाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

भारत आणि ओमान यांच्यातील सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव शेवटपर्यंत फलंदाजीला आला नव्हता. तो डगआऊटमध्ये पॅड घालून बसला होता. पण त्याने इतरांना फलंदाजीला जाण्याची संधी दिली. स्वतः मात्र शेवटपर्यंत फलंदाजीला आला नाही. सामना झाल्यानंतर त्याने ओमान संघाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

नवखा ओमानचा संघ पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. गेल्या दोन्ही सामन्यात या संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पण या सामन्यात ओमानच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. ओमानला विजय मिळवण्याची संधी होती. पण वर्ल्ड नंबर १ भारतीय संघाने शेवटी दमदार पुनरागमन केलं आणि हा सामना आपल्या खिशात घातला. पण कर्णधार सूर्यकुमार यादवने ओमानच्या खेळाडूंचं कौतुक केलं. त्यांच्या आत्मविश्वास वाढवला. सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “एकंदरीत, मला वाटतं ओमाननं अविश्वसनीय खेळ केला. तो खूपच अद्भुत होता. त्यांची फलंदाजी पाहून मला तर खूप आनंद झाला.”

या सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने ओमान क्रिकेट संघातील खेळाडूंची आणि प्रशिक्षकांची भेट देखील घेतली. त्यानंतर खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. त्यांना आपला अनुभव सांगितला. खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत फोटोशूट केलं. यामुळे नक्कीच ओमानच्या खेळाडूंच्या आत्मविश्वासात भर पडेल. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १८८ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ओमानला ४ गडी बाद १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटी ओमानचा संघ विजयापासून २१ धावा दूर राहिला.