Asia Cup 2025 Super 4 Qualification Scenario: आशिया चषक २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिराती (युएई) संघाने आज १५ सप्टेंबरला झालेल्या सामन्यात ओमानचा पराभव केला आहे. युएईच्या विजयामुळे अ गटातील सुपर फोर गाठण्याची स्पर्धा अधिक चुरशीची झाली आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान संघ आहेत.

भारतीय संघ २ सामन्यांत २ विजयांसह अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे टीम इंडिया अधिकृतपणे सुपर-४ मध्ये पोहोचली आहे. आता १७ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि यूएई यांच्यात होणारा सामना नॉकआउट सामना असणार आहे आहे. या सामन्यामुळे सुपर-४ मध्ये कोण पोहोचणार हे ठरवलं जाईल. तर ओमानचा संघ दोन्ही सामने गमावत सुपर फोर गाठण्याच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

सुपर फोर गाठण्यासाठी युएई संघाला काय करावं लागणार?

संयुक्त अरब अमिराती संघाचे २ सामन्यांत २ गुण आहेत. पाकिस्तानचेही २ सामन्यांत २ गुण आहेत. सुपर-४ मध्ये पोहोचण्यासाठी यूएईला पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावं लागेल. जर असं झालं तर युएई ४ गुणांसह सुपर-४ मध्ये पोहोचेल.

पाकिस्तान आणि यूएई यांच्यात आतापर्यंत ३ सामने झाले आहेत. पाकिस्तानने यापैकी तिन्ही सामने जिंकले आहेत. आशिया चषकापूर्वी दोन्ही संघ तिरंगी मालिकेत आमनेसामने होते. पाकिस्तानने यादरम्यान २ वेळा यूएईचा पराभव केला. युएईसाठी पाकिस्तानला हरवणं कठीण असू शकतं, पण ते अशक्य नाही. पाकिस्तानचा संघ अनेकदा अपसेटचा बळी ठरला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि संघाला गट टप्प्यातून बाहेर पडावं लागलं होतं.

भारताचा गट टप्प्यातील अखेरचा सामना

युएई संघाने जर पाकिस्तानला पराभूत करत अपसेट घडवला, तर भारत आणि युएईचा संघ सुपर फोरमध्ये जाऊ शकतात. अन्यथा पाकिस्तानने युएईचा पराभव केला तर भारत आणि पाकिस्तानचे संघ सुपर फोर गाठतील. यासह भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमनेसामने येतील.

भारताला १९ सप्टेंबरला ओमानविरुद्ध गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळायचा आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. युएईनंतर त्यांनी पाकिस्तानलाही एकतर्फी सामन्यात पराभूत केलं.