आशिया कप २०२५ बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आशिया कप २०२५ स्पर्धा आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २४ जुलै म्हणजेच आज ढाका येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. याचबरोबर भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघही एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर या स्पर्धेवर शंका निर्माण झाली होती. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच बिघडले होते. पण यानंतर बीसीसीआयने स्पर्धेसाठीच्या बैठकीत उपस्थिती दर्शवली आणि आता निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दुबई आणि अबुधाबी अशा संभाव्य तटस्थ ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. भारताकडे २०२५ च्या आशिया कपचे यजमानपद आहे. पण ते ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित करू शकते. बीसीसीआयने आशिया कपसाठी तीन ठिकाणांसाठी अमिराती क्रिकेट बोर्डाशी करार केला आहे, परंतु ते फक्त दोन स्टेडियममध्ये सामने आयोजित करतील.
आशिया कपचे सामने दुबई आणि अबुधाबी येथे होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जास्तीत जास्त तीन सामने होऊ शकतात. आशिया कप २०२५ चे वेळापत्रक अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. परंतु सामने ७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान आयोजित केले जाऊ शकतात.
आशिया कप वेळापत्रकाबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी अंतिम निर्णय घेतील. याबाबतची माहिती पुढील काही दिवसांत येईल. आशिया कप २०२५ टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा होईल. शेवटचा आशिया कप २०२३ मध्ये झाला होता.
गेल्या आठवड्यात, बीसीसीआयने एसीसीला कळवलं होतं की जर भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय तणावामुळे ढाका येथे बैठक झाली तर बीसीसीआय उपस्थित राहणार नाही. पण बुधवारी एसीसीला कळवण्यात आलं की राजीव शुक्ला व्हर्च्युअल पद्धतीने बैठकीत सहभागी होतील.