Mohsin Naqvi In ACC Meeting: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवत जेतेपदाची नोंद केली. पण क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असावं की, एखाद्या संघाने अंतिम सामना जिंकला, पण तो संघ जेतेपदाची ट्रॉफी घेतल्याशिवाय माघारी परतला आहे. आशिया चषक २०२५ स्पर्धेची ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते दिली जाणार होती. पण भारतीय कर्णधाराने आधीच स्पष्ट केलं होतं की, भारतीय संघ मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाही आणि झालंही तसंच.भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन केलं, पण ट्रॉफी स्वीकारली नाही.
मंगळवारी (३० सप्टेंबर) आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी ट्रॉफी न दिल्याचा जोरदार विरोध केला. यादरम्यान एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना ट्रॉफी न दिल्यामुळे खूप काही ऐकावं लागल्याची माहिती समोर येत आहे.
या बैठकीत बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार आशिष शेलार यांनी बीसीसीआयचं प्रतिनिधित्व केलं. एसीसीच्या एका सुत्राने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितलं की,ट्रॉफी विजेत्या खेळाडूंना देण्यात यावी. ही एसीसीसी ट्रॉफी आहे, कोणाची वैयक्तिक ट्रॉफी नाही.”
यावर उत्तर देताना मोहसीन नक्वी म्हणाले, “मी तर तिकडे काही कारण नसताना तिकडे कार्टूनसारखा उभा होतो. भारतीय क्रिकेट माझ्या हातून ट्रॉफी घेणार नाही, असं एशियन क्रिकेट परिषदेला कोणीच लिखित स्वरूपात सांगितलेलं नव्हतं. “माध्यमातील वृत्तानुसार,आशिया चषकाची ट्रॉफी एसीसीच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आली आहे. मोहसीन नक्वी ही ट्रॉफी परत देणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण यासाठी त्यांनी एक अट देखील ठेवली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ५ गडी राखून विजयाची नोंद केली होती. हा भारताचा पाकिस्तानवर आशिया चषक २०२५ स्पर्धेत मिळवलेला सलग तिसरा विजय ठरला. अंतिम सामना झाल्यानंतर उपविजेत्यांच्या पुरस्कारांसह इतर सर्व पुरस्कार देण्यात आले. पण भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्टेजवर जाण्यास नकार दिला. दरम्यान आशिया चषकाची ट्रॉफी भारतात केव्हा येणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.