Why Indian Team Refused To Collect Asia Cup Trophy From Mohsin Naqvi: भारताने शेवटच्या षटकात पाकिस्तानचा पराभव करत विक्रमी ९व्यांदा आशिया चषक जिंकला. या विजयानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया क्रिकेट परिषदेचे प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
एकीकडे भारत मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार नव्हता, तर दुसरीकडे मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी देण्याचा आग्रह धरल्याने पारितोषिक वितरण समारंभाला एका तासाहून अधिक विलंब झाला. पण भारताच्या ठाम भूमिकेनंतर पारितोषिक वितरण समारंभ ट्रॉफी वितरणाविना संपला.
भारतीय खेळाडू एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार होते. परंतु नक्वी यांनी यास नकार दिला. विलंब वाढत गेल्याने सामना अधिकाऱ्यांनी ट्रॉफी वितरित न करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाने का स्वीकारली नाही ट्रॉफी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटूंनी नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देण्यामागील कारण म्हणजे मोहसीन नक्वी यांनी अंतिम सामन्यापूर्वी एक्सवर ‘Final Day’ अशा शीर्षकाचे फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये कर्णधार सलमान आगा आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसह पाकिस्तानी क्रिकेटपटू फ्लाइट सूट परिधान केलेले दिसत होते आणि पार्श्वभूमीत हवाई लढाऊ विमानांचे फोटो दिसत होते. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
याआधीही मोहसीन नक्वी यांनी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोलचा आनंद साजरा करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो विमान कोसळल्याचे हावभाव करत आहे. नक्वी यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा व्हिडीओ शेअर करत भारत-पाकिस्तान संघर्षावरून वाद निर्माण केला होता. संपूर्ण आशिया चषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानने भारताची विमाने पाडली, या बिनबुडाच्या दाव्याला एक प्रकारे बळकटी देण्याचे काम त्यांचे क्रिकेटपटू आणि क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष करताना दिसत होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाने नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकारण्याची कठोर भूमिका घेतली.
२०२५ चा आशिया चषक अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान विरोधात तीन सामने खेळला. या तिन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तोंदलन केले नाही. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या लष्करी संघार्षाचे परिणाम क्रिकेट मैदानावरही पाहायला मिळाले.