कोणताही खेळ हा दोन गोष्टींमुळे प्रगतिपथावर येत असतो, खेळाडू आणि खेळाडूंचे मार्गदर्शक. खेळाडूंच्या कामगिरीमुळे खेळाला प्रसिद्धी आणि ग्लॅमर मिळत असते, तर मार्गदर्शक खेळासाठी किती तत्पर आणि सर्वस्व वाहून काम करतात, यावर खेळाची प्रगती अवलंबून असते. संघटनेचाही यामध्ये थोडाफार हातभार असावा लागतो म्हणा, पण कुचकामी संघटना स्क्वॉशसाठी जास्त काही करू शकलेली नाही. इन्चॉनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा भारतासाठी एका अर्थाने महत्त्वाची ठरली, कारण काही नवीन खेळांमध्ये भरीव कामगिरी पाहायला मिळाली आणि यामधला एक महत्त्वाचा इतिहास घडवणारा खेळ म्हणजे स्क्वॉश.
ब्रिटिशांनी जवळपास १४० वर्षांपूर्वी स्क्वॉश हा खेळ शोधून काढला. त्यानंतर त्यांनी भारतातही या खेळाचा प्रसार करायचा प्रयत्न केला. भारत स्वतंत्र झाल्यावरही खेळाची प्रगती होत नव्हती. पण गेल्या आठ वर्षांमध्ये भारताने या खेळात दमदार कामगिरी केली, याचे श्रेय काहीसे भारतीय स्क्वॉश अकादमीला द्यायला हरकत नसावी. सारयस पोंचा या माजी खेळाडूने खेळाचा विकास आणि प्रसार व्हावा, यासाठी चेन्नईमध्ये एक अकादमीची सुरुवात केली. सध्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी सौरव घोषाल, महेश माणगावकर, हरिंदर पाल सिंग हे तिघेही याच अकादमीमधले. त्याचबरोबर या अकादमीमधून दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा यांनीही स्क्वॉशचे धडे गिरवलेले आहेत. मलेशियाच्या मेजर मनिआम यांच्या मार्गदर्शनाखील या खेळाडूंनी खेळायला सुरुवात केली आणि आजच्या घडीला आपण त्यांच्या मेहनतीचे फळ पाहतच आहोत.
भारतीय स्क्वॉशसाठी सौरव हा आदर्शवत ठरावा असाच खेळाडू. २००६मध्ये त्याने दोहाच्या आशियाई स्पर्धेत पहिले पदक पटकावले, २०१०च्या गुआंगझवू स्पर्धेत पुन्हा त्याने कांस्यपदक पटकावले आणि संघानेही कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले आणि संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. आतापर्यंत सौरवचा कामगिरीचा चढता आलेख अन्य भारतीय खेळाडूंसाठीही प्रेरणादायी ठरला आहे आणि त्यामुळेच या स्पर्धेत भारताने स्क्वॉशमध्ये चार पदकांची कमाई केली आहे. महिला एकेरीमध्ये दीपिकाने कांस्य, तर महिलांनी सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावले. यामध्ये अजून एक पदक भारताला मिळाले असते, पण सदोष कार्यक्रमामुळे दीपिका आणि जोश्ना उपान्त्यपूर्व फेरीत एकमोकांसमोर आल्या आणि भारताचे एक पदक कमी झाले.
संघटनेच्या बाबतीत म्हणायचे, तर फारसे आशादायक चित्र वगैरे नक्कीच नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे बंधू एन. रामचंद्रन यांच्या हातामध्ये भारतीय स्क्वॉश महासंघ बरीच वर्षे होता. २००० साली त्यांच्यावर खेळाडूंना पुरेशी संधी देत नसल्याचे आरोपही झाले होते. त्यामधून सहीसलामत बाहेर पडून आता रामचंद्रन जागतिक संघटनेच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. पण तरीही खेळाडूंना पुरेशा सोयी-सुविधा मिळत नाही. त्यामुळेच बऱ्याच खेळाडूंना चेन्नईला जावे लागते, महाराष्ट्रातला महेश माणगावकर हे त्याचेच एक उदाहरण. दीपिका ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सारा फिट्सगेरारचे मार्गदर्शन घेते. पायाभूत सुविधाच संघटनेला उभारता आलेल्या नाहीत तिथे त्यांनी खेळाडूंकडन पदाकाची अपेक्षा कोणत्या धर्तीवर करायची.
संघटना कुचकामी असली तरी खेळाडूंनी मिळवलेले हे दैदीप्यमान यश नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. स्क्वॉशने घेतलेली ही भरारी अशीच चिरंतन राहो, हीच भारतीयांची आशा असेल.
