एपी, सिडनी

ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ४ बाद ४७५ धावसंख्येवर घोषित करताना पावसाने प्रभावित झालेला चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत शनिवारी दक्षिण आफ्रिकेचे सहा गडी बाद केले होते. त्यामुळे कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या दृष्टीने त्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
कमिन्सने वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या परिस्थितीत चांगली गोलंदाजी करताना २९ धावांत ३ बळी मिळवले, तर हेजलवूडने २९ धावांत २ फलंदाजांना माघारी धाडले. दक्षिण आफ्रिकेचे दिवसअखेर ६ बाद १४९ धावसंख्येपर्यंत मजल मारली असून ते अजूनही ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येच्या ३२६ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकायचा झाल्यास रविवारी अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित चार फलंदाजांना माघारी पाठवत त्यांना आफ्रिकेला फॉलोऑन द्यावा लागेल. त्यासह दुसऱ्या डावातही लवकर गडी बाद करावे लागतील. या सामन्यात विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित करेल. शुक्रवारी पावसाच्या संततधारेमुळे खेळ होऊ शकला नाही.

शनिवारी सकाळी पावसामुळे दिवसाचे पहिले सत्र वाया गेले. त्यामुळे कमिन्सला डाव घोषित करण्यास भाग पाडले. उस्मान ख्वाजा १९५ धावांवर नाबाद राहिला. यानंतर ऑस्ट्रेलियासमोर पाच सत्रांत २० गडी बाद करण्याचे आव्हान होते. डावाच्या नवव्याच षटकात हेझलवूडने कर्णधार डीन एल्गरला (१५) बाद केले. यानंतर लॉयनने सारेल एरवी (१८) आणि कमिन्सने हेन्रीच क्लासेनला (२) बाद करत दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३७ अशी बिकट केली. टेम्बा बाव्हुमा (३५) आणि खाया झोंडोने (३९) चौथ्या गडय़ासाठी ४८ धावांची भागीदारी केली. हेझलवूडने बाव्हुमाला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली. यानंतर झोंडोने काइल व्हेरेनसह (१९) पाचव्या गडय़ासाठी ४५ धावा जोडल्या. मात्र, कमिन्सने झोंडो व नंतर व्हेरेनला माघारी पाठवत आफ्रिकेच्या अडचणीत भर घातली. खेळ संपला तेव्हा मार्को यान्सेन (नाबाद १०) आणि सिमोन हार्मर (६) खेळत होते.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १३१ षटकांत ४ बाद ४७५ (उस्मान ख्वाजा नाबाद १९५, स्टीवन स्मिथ १०४; आनरिक नॉर्किए २/५५)
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ५९ षटकांत ६ बाद १४९ (खाया झोंडोने ३९, टेम्बा बाव्हुमा ३५; पॅट कमिन्स ३/२९, जोश हेझलवूड २/२९)