ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील अॅशेस मालिका जशी प्रतिष्ठेची असते, तशीच आगामी काळात कबड्डीमध्येही सुरू व्हावी. या खेळातील अॅशेस जिंकणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असावे, अशी आशा ऑस्ट्रेलियाच्या कबड्डी संघाचा कर्णधार कॅम्पबेल ब्राऊनने प्रकट केली. ऑस्ट्रेलियाला चालू विश्वचषकात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नसली तरी पुढील विश्वचषकात यापेक्षा अधिक भरारी घेऊ, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील हाडवैर क्रिकेट आणि हॉकीच्या मैदानांवर दिसून येते, भविष्यात कबड्डीमध्येही ती दिसून येईल का, या प्रश्नाला उत्तर देताना ब्राऊन म्हणाला, ‘‘भारतात आणि भारताशी अधिकाधिक सामने खेळल्यानंतर आमचा खेळ उंचावेल, त्यानंतर याबाबत विचार करता येईल. सध्या आमचा संघ युवा आहे. मॅटवर खेळण्याला पूर्णत: सरावलेलो नाही. हा कौशल्याचा खेळ आहे, ज्यात आक्रमण आणि बचावाची काळजी घ्यावी लागते. भारत हा अतिशय अनुभवी आणि तांत्रिकदृष्टय़ा समृद्ध संघ आहे.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येत आहे. या वेळी कबड्डीचा संघसुद्धा भारत दौऱ्यावर आला तर क्रीडारसिकांना दुहेरी आनंद मिळू शकेल. याचप्रमाणे विविध वयोगटांच्या संघांनीसुद्धा एकमेकांच्या देशांचे दौरे केले तर ते खेळाच्या विकासासाठी पूरक ठरू शकतील.’’
ब्राऊन हा ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या फाऊंडेशनचा सदिच्छादूत आहे. वॉर्नसोबत करीत असलेल्या कार्याविषयी ब्राऊन म्हणाला, ‘‘मी शालेय स्तरावर क्रिकेट खेळलो होतो. मात्र या खेळात गुणवत्ता सिद्ध करू शकलो नाही. पण तरीही वॉर्नशी मैत्री जुळली. वॉर्नच्या फाऊंडेशनच्या मदतीसाठी मी एक सागरी अंतर पोहोण्याचे आव्हान स्वीकारले होते, मात्र दुर्दैवाने ते मी पूर्ण करू शकलो नाही. वॉर्न कबड्डीविषयी जाणून होता. विश्वचषकात प्रतिनिधित्व करायला जातोय, याचे त्याला कौतुक वाटले. तू देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे, त्याचा अभिमान बाळग. ऑस्ट्रेलियाकडून जे सामने खेळशील, त्यात लोकांना आनंद देणारा खेळ कर, असा सल्ला त्याने मला दिला.’’
विश्वचषकाच्या तयारीची माहिती देताना ब्राऊन म्हणाला, ‘‘आम्हाला स्पध्रेच्या नियमांची पुस्तके देण्यात आली होती. याशिवाय पंचांच्या इशाऱ्यांचासुद्धा सराव करण्यात आला. प्रशिक्षकांनी आम्हाला खेळाची इत्थंभूत माहिती करून दिली. आम्ही या विश्वचषकाआधी बरेच सामने पाहिले आणि खेळाचा अभ्यास केला. पहिल्या सामन्यात थोडे दडपण जाणवले, मात्र आता आत्मविश्वासाने आम्ही खेळत आहोत.’’
कबड्डीकडे कसा वळलास, या प्रश्नाचे उत्तर देताना ब्राऊन म्हणाला, ‘‘कबड्डी म्हणजे एक प्रकारे मांजर आणि उंदराची पकडापकडी असते. याचे तंत्र अप्रतिम आहे. आक्रमण आणि बचाव हे त्याचे स्थायिभाव आहेत. या खेळात तंदुरुस्तीचा कस लागतो. क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या सामन्यासोबत संगीत आणि रसिकांचा उत्स्फूर्तपणा हे सारे एखाद्या ट्वेन्टी-२० सामन्याचाच आनंद देते.’’
ऑस्ट्रेलियात संघाच्या विश्वचषकातील कामगिरीविषयी किती उत्सुकता आहे, हे मांडताना ब्राऊन म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियात आकाशवाणी, दूरदर्शन या सर्व माध्यमांतून विश्वचषकाकडे लोक लक्ष ठेवून आहेत. कबड्डी हा खेळ काय आहे, हे समजून घेतानाच या विश्वचषकाची तयारी, आव्हाने यांचा वेध त्यांनी घेतला. आमच्या प्रसारमाध्यमांनी कबड्डीसुद्धा गांभीर्याने पाहिले, याचे अप्रूप वाटते. ही सकारात्मक गोष्ट मला वाटते.’’
ऑस्ट्रेलियातील कबड्डीच्या विकासाविषयी तो म्हणाला, ‘‘आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाच्या प्रयत्नांमुळे आम्ही विश्वचषकात पोहोचू शकलो आहोत. आमच्या संघात बरेचसे खेळाडू हे मूळ रग्बी, फुटबॉल, क्रिकेट इत्यादी खेळांचा अनुभव असलेले खेळाडू आहेत. हा खेळ तळागाळांत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. विशेषत: लहान वयातले खेळाडू घडवायची प्रक्रिया सुरू व्हायला हवी, म्हणजे ते मोठे झाल्यावर उत्तम गुणवत्ता देशाला मिळू शकेल.’’
