केप टाऊन : गेल्या वर्षभरात झपाटय़ाने प्रगती करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाला आता ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद खुणावते आहे. मात्र, घरच्या मैदानावर ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेच्या संघाला पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करताना तज्ज्ञांचे अंदाज चुकवले. मात्र, महिला क्रिकेटमधील सर्वात बलाढय़ मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला नमवायचे झाल्यास दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सर्वच आघाडय़ांवर सर्वोत्तम खेळ करावा लागेल. ऑस्ट्रेलियाने सलग सात वेळा जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पाच वेळा ते विश्वविजेते आहेत.

लॉरा वोल्व्हार्ड आणि ताझमिन ब्रिट्स ही स्पर्धेतील सर्वोत्तम सलामीची जोडी दक्षिण आफ्रिकेकडे आहे. ब्रिट्स जागतिक कुमार गटात भालाफेक प्रकारातील विजेती खेळाडू. २०१२ मध्ये एका कार अपघातात तिचे ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंग पावले. मात्र, तिच्या कामगिरीमुळे आता दक्षिण आफ्रिका महिला संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाची संधी निर्माण झाली आहे. या दोघींच्या खेळातील सातत्य ही दक्षिण आफ्रिकेची खरी ताकद आहे. अष्टपैलू मॅरीझान कॅपनेही यजमानांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडवरील विजयात तिची कामगिरी निर्णायक ठरली होती. शबनम इस्माईल आणि अयाबोंगा खाका या वेगवान गोलंदाज प्रभावी मारा करत आहेत. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात या दोघीही सक्षम असल्याचे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले होते. कर्णधार सूने लसकडूनही दक्षिण आफ्रिकेला दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.

साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा सहज पराभव केला असला, तरी अंतिम सामन्यात आफ्रिकेचा संघ आपला खेळ नक्कीच उंचावेल. तसेच त्यांना प्रेक्षकांचाही पाठिंबा लाभेल. यजमानांच्या इथपर्यंतच्या प्रवासाला ऑस्ट्रेलिया नक्कीच कमी लेखणार नाही. महिला क्रिकेटमध्ये सध्या तरी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे. त्यांची अकराव्या क्रमांकावरची फलंदाजही संघाला सामना जिंकवून देण्यात सक्षम आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार मेग लॅनिंग, बेथ मूनी, एलिसा हिली, एलिस पेरी यांच्यावर, तर गोलंदाजीची भिस्त मेगन शूट आणि डार्सी ब्राउन यांच्यावर असेल. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक खेळाडूंमध्ये असलेली विजिगीषू वृत्ती हीच त्यांची खरी ताकद मानली जाते. ऑस्ट्रेलियाकडे अ‍ॅश्ले गार्डनर, पेरी आणि ताहलिया मॅकग्रा यांसारख्या उत्कृष्ट अष्टपैलू आहेत. त्यामुळे त्यांचे या सामन्यात पारडे जड मानले जात आहे. परंतु त्यांना धक्का देत प्रथमच ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल.

ठिकाण : न्यूलँड्स, केप टाउन वेळ : सायं. ६.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, हॉट स्टार    

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia vs south africa final match prediction of womens t20 world cup zws