वृत्तसंस्था, मुंबई
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परतला असून सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून अनिश्चित काळासाठी बाहेर गेला आहे.ऑस्ट्रेलियन संघाचा पुढील सामना शनिवारी इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे होणार आहे. मार्श या महत्त्वाच्या सामन्याला मुकणार हे निश्चित आहे. या सामन्यासाठी तारांकित अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलही उपलब्ध नसेल. सोमवारी गोल्फ कार्टमधून पडल्यामुळे मॅक्सवेलच्या डोक्याला हलका मार लागला आणि त्याला ‘कन्कशन’ झाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मॅक्सवेल आणि मार्श या दोन प्रमुख अष्टपैलूंविनाच इंग्लंडविरुद्ध खेळावे लागणार आहे.
‘‘मार्श बुधवारी रात्री उशिराने मायदेशी परतला. कौटुंबिक कारणामुळे त्याला परत जावे लागले आहे. कुटुंबापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही. त्यामुळे त्याने घेतलेला निर्णय योग्यच आहे. तो पुन्हा भारतात कधी येणार हे अद्याप निश्चित नाही. ‘मला काही काळासाठी घरी परतावे लागत आहे, पण विश्वचषक जिंकण्यासाठी मी लवकरच परत येईन’ असा संदेश त्याने आम्हाला पाठवला आहे,’’ अशी माहिती ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिसने दिली. मार्शने यंदाच्या स्पर्धेत सहा सामन्यांत ३७.५०च्या सरासरी आणि ९१.४६च्या स्ट्राईक रेटने २२५ धावा केल्या आहेत. यात प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतकाचा समावेश आहे. अहमदाबाद येथील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मार्शची कमी जाणवू शकेल.