फ्लॉइड मेवेदरविरुद्ध जागतिक बॉक्सिंग परिषदेची लढत एकतर्फी गमावल्यानंतर मॅन्नी पकिआओ याच्यापुढील समस्या आणखीनच वाढल्या आहेत. त्याने दुखापतीची माहिती लपविल्याबद्दल चाहत्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
चाहत्यांनी पकिआओ, त्याचे प्रवर्तक टॉप रँक, टेलिव्हिजन कंपन्या एचबीओ व शोटाइम यांच्याविरुद्ध इलिनोईस येथील न्यायालयात फसवणुकीचा अर्ज दाखल केला आहे. तसेच त्यांनी एटी अॅण्ड टी, कॉमकास्ट, डीरेक टीव्ही या केबल कंपन्यांनाही न्यायालयात खेचले आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पकिआओ याच्या तंदुरुस्तीबाबत चुकीची माहिती देत संयोजकांनी चाहत्यांची फसवणूक केली आहे. त्याच्या खांद्याला दुखापत आहे याची माहिती त्यांनी न देता या लढतीचे मोठय़ा प्रमाणात विपणन केले व त्याद्वारे करोडो डॉलर्सची कमाई केली. केवळ इलिनोईस नव्हे तर अन्य तीन-चार ठिकाणीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
या लढतीपूर्वी झालेल्या वैद्यकीय चाचणीत पकिआओ याने खोटी माहिती दिल्याचा आरोपही काही चाहत्यांनी केला आहे. खांदा, कोपरा व हात यांना पूर्वीपासून दुखापत आहे काय, या प्रश्नाला त्याने नाही असे खोटे उत्तर दिले असेही चाहत्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पकिआओचे सल्लागार मायकेल कोन्झाक यांनाही आरोपी करण्यात आले आहे. मात्र मायकेल यांनी आपल्याला विनाकारण या खटल्यात गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. पकिआओचे कायदेशीर सल्लागार डॅनियल पेच्रोसेली यांनी या खटल्यांमधून आपल्या अशिलाची निदरेष सुटका होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, पकिआओ याला लढत सुरू झाल्यानंतर लगेचच दुखापत झाली.
मेवेदर याला या लढतीमधून तीनशे दशलक्ष डॉलर्सची तर पकिआओ यालाही शंभर दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळणार आहे.
दरम्यान, पकिआओ याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे त्याचे वैद्यकीय सल्लागार नील एलअॅट्रेची यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पकिआओ याची दुखापत खूप मोठी आहे व कदाचित त्याच्या बॉक्सिंग कारकीर्दीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
मॅन्नी पकिआओविरोधात चाहत्यांची न्यायालयात धाव
फ्लॉइड मेवेदरविरुद्ध जागतिक बॉक्सिंग परिषदेची लढत एकतर्फी गमावल्यानंतर मॅन्नी पकिआओ याच्यापुढील समस्या आणखीनच वाढल्या आहेत.

First published on: 08-05-2015 at 12:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boxing fans sue manny pacquiao over shoulder injury