Brian Bennett World Record: टी-२० विश्वचषक २०२६ पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता सामने सध्या इतर संघांमध्ये खेळवले जात आहेत. यामध्ये झिम्बाब्वेचा संघही पात्रता सामने खेळत आहेत. टांझानिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील पात्रता सामन्यात ब्रायन बेनेटने दणदणीत शतक झळकावत मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

ब्रायन बेनेटने शानदार शतक झळकावत क्रिकेट जगतात इतिहास घडवला आहे. त्याने असा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला यापूर्वी करता आलेल नाही. त्याच्या शतकी खेळीमुळे झिम्बाब्वेने टांझानियाचा ११३ धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला.

ब्रायन बेनेटची ६० चेंडूत शतकासह १११ धावांची खेळी

झिम्बाब्वे आणि टांझानिया यांच्यातील टी-२० सामन्यात ब्रायन बेनेटने फक्त ६० चेंडूत १५ चौकार आणि दोन षटकारांसह १११ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकांत ५ बाद २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात टांझानियाला फक्त १०८ धावा करता आल्या आणि सामना ११३ धावांनी गमावला. संपूर्ण टांझानियन संघाने मिळून एकट्या ब्रायन बेनेटपेक्षा जास्त धावा करू शकला नाही.

झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेटचं वय फक्त २१ वर्षे आणि ३२४ दिवस इतकं आहे. तो आता तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं करणारा पहिला सर्वात तरूण फलंदाज बनला आहे. इतक्या कमी वयात तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकं करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. याआधी कोणत्याच फलंदाजाने ही कामगिरी केली नाही. ब्रायन बेनेट हा पराक्रम करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.

ब्रायन बेनेटने झिम्बाब्वेसाठी १० कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने दोन शतकांसह ५०३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ११ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ३४८ धावा केल्या आहेत आणि एक शतकही केलं आहे. त्याने आतापर्यंत ४३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यामुळे त्याने या फॉरमॅटमध्ये शतकही केलं आहे. ब्रायन बेनेट गोलंदाजी देखील करतो. त्याने कसोटी सामन्यांमध्ये सहा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील ६ विकेट्स घेतल्या आहेत.