बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, ईऑन मॉर्गन यांना प्रत्येकी २ कोटींची पायाभूत किंमत

इंग्लंड क्रिकेट संघासाठी नुकताच आटोपलेला भारतीय दौरा सर्वार्थाने अपयशी स्वरुपाचा ठरला. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र झुंजार कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांनी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या दहाव्या हंगामासाठीच्या लिलावासाठी दमदार पायाभूत किंमत मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार ईऑन मॉर्गनसह अष्टपैलू ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स यांना लिलावासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांची पायाभूत किंमत मिळवली आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि दुखापतीतून सावरलेला गोलंदाज पॅट कमिन्स यांनीही या यादीत स्थान मिळाले आहे. सातत्याने विविध दुखापतींनी हैराण असलेला श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा या यादीत समावेश चकित करणारा आहे. २० फेब्रुवारीला बंगळुरूत दहाव्या हंगामासाठीचा लिलाव होणार आहे.

गेल्या दोन वर्षांत सातत्याने धावांची टांकसाळ उघडणारा इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, ऑस्ट्रेलियाचे नॅथन लिऑन आणि ब्रॅड हॅडिन, दक्षिण आफ्रिकेचा कायले अ‍ॅबॉट यांच्यासह वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर यांना लिलावासाठी प्रत्येकी दीड कोटी एवढी किंमत मिळाली आहे.

यंदाच्या लिलावासाठी ७९९ खेळाडूंचा विचार करण्यात आला. प्राथमिक छाननीनंतर आठ देशांतील मिळून ६३९ खेळाडूंची निवड करण्यात आली. २०१८च्या हंगामानंतर आयपीएल स्पर्धेतील सर्वच संघांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंना नवीन संघातर्फे खेळण्यासाठी एकच वर्ष मिळणार आहे. २०१८च्या हंगामासाठी महालिलाव होणार आहे.

२ कोटी रुपये (पायाभूत किंमत)

  • अँजेलो मॅथ्यूज- श्रीलंका
  • बेन स्टोक्स- इंग्लंड
  • ख्रिस वोक्स- इंग्लंड
  • इऑन मॉर्गन- इंग्लंड
  • इशांत शर्मा-भारत
  • मिचेल जॉन्सन- ऑस्ट्रेलिया
  • पॅट कमिन्स- ऑस्ट्रेलिया

१.५ कोटी रुपये (पायाभूत किंमत)

  • जॉनी बेअरस्टो- इंग्लंड
  • ट्रेंट बोल्ट-न्यूझीलंड
  • ब्रॅड हॅडीन- ऑस्ट्रेलिया
  • नॅथन लियॉन- ऑस्ट्रेलिया
  • कायले अबॉट-दक्षिण आफ्रिका
  • जेसन होल्डर-वेस्ट इंडिज