मुंबई : संघाला नेतृत्व देण्याच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या शैली भिन्न असल्या, तरी त्यांनी रविचंद्रन अश्विनच्या साथीत भारतीय संघाला परदेशात कसोटी सामना जिंकण्याचा मार्ग दाखवला, अशा शब्दात भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिलने या तिन्ही माजी खेळाडूंच्या कारकीर्दीला सलाम केला. वयाच्या २५व्या वर्षीच भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पडल्यानंतर गिलने रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ध्वनिचित्रफितीद्वारे प्रथमच संवाद साधला.
‘‘रोहित, विराट आणि अश्विनसारखे खेळाडू हे आमच्या संघाचे आधारस्तंभ होते. त्यांनी आम्हाला घराबाहेर क्रिकेट कसे खेळायचे, सामने कसे जिंकायचे याचे उदाहरण घालून दिले आहे. आम्हाला त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर फक्त चालायचे आहे,’’ असे गिल म्हणाला.
विराटने आपल्या स्वभावानुसार नेतृत्व करताना कायम उत्कट शैली दाखवली, तर रोहितनेही आक्रमकतेची कास सोडली नाही. पण, त्याने ती आपल्या अभिव्यक्तीतून कधी दाखवली नाही, असे गिल म्हणाला. कर्णधारपदाच्या जबाबदारीचा खेळावर परिणाम होतो असे म्हटले जाते. मात्र, रोहित, विराट दोघांनी या दृष्टिकोनापासून सर्वांना दूर नेले. त्यांच्याबरोबर राहिल्यानेही मला खूप काही शिकता आले, असे गिलला वाटते.
कर्णधार ही एक जबाबदारी असते, असे सांगून गिलने कर्णधार आणि कामगिरी या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवण्यास आपल्याला आवडेल असे सांगितले. ‘‘फलंदाज असतो, तेव्हा मला खेळपट्टीवर कर्णधार म्हणून नाही, तर फलंदाज म्हणून निर्णय घेता यावेत. कारण फलंदाजी तुम्हाला स्वातंत्र्य देत असते. त्यामुळे फलंदाजी करताना कायम तुम्ही कर्णधार आहात हे विसरुन जावे,’’ असे गिल म्हणाला.
‘‘खेळायला सुरुवात केली तेव्हा भारतासाठी खेळायचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार होत असतानाच कर्णधारपदाची जबाबदारी येऊन पडली आहे. माझ्यासाठी ही संधी आहे आणि या संधीची मी वाट पाहत आहे. इंग्लंडमधील आगामी मालिका ही आव्हानात्मक आणि रोमांचक असेल,’’ असे गिलने सांगितले.
खेळाडूंसमोर आदर्श ठेवून आणि त्यांना त्यांची स्वत:ची जागा देण्याचे आपले नियोजन असेल, असे गिल म्हणाला. कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल अधिक गांभीर्याने बोलताना गिलने कर्णधाराला क्रिकेट खोलवर जाणून घेता यायला हवे आणि खेळाडूंशी संवाद साधणे जमायला हवे, असे सांगितले.
रोहित आणि विराट यांच्याकडून मला नेहमीच प्रेरणा मिळाली. त्यांच्यासोबत खेळायला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान मानतो. त्यांची नेतृत्त्वाची शैली भिन्न होती, पण उद्दिष्ट विजयाचेच होते. – शुभमन गिल, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार.
गिलसमोर सुरुवातीलाच आव्हान पुजारा
नवी दिल्ली : तरुण खेळाडू असा किंवा अनुभवी; पण, जेव्हा तुम्ही परदेशात खेळायला जाता तेव्हा तुमच्यासमोर ते वेगळे आव्हान असते. अशाच कठीण आव्हानाचा सामना शुभमन गिलला कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत करावा लागणार असल्याचे मत भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले. ‘‘इंग्लंडमध्ये आपल्या कर्णधारपदाच्या नव्या कारकीर्दीला सुरुवात करणे गिलसाठी सोपे नसेल. फलंदाजी करताना, कर्णधार आहात हे विसरून जायचे असते. कर्णधार म्हणून तुम्हाला नेहमीच संघासाठी चांगले करायचे असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्हाला वेगळ्या ठेवता आल्या पाहिजेत. कर्णधार म्हणून माहित नाही, पण फलंदाज म्हणून गिल इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करेल. कर्णधारपदाच्या जबाबदारीचा गिलच्या फलंदाजीवर परिणाम होणार नाही. फलंदाज म्हणून त्याच्याकडे अलौकिक प्रतिभा आहे. तो त्याच्या फलंदाजीचा दृष्टिकोन बदलेल असे वाटत नाही. परंतु, त्याला या वेळी इंग्लिश परिस्थिती समजून घ्यावी लागेल. गोलंदाजांची योग्यता शोधावी लागेल,’’ असे पुजाराने सांगितले.