Champions League Football लिव्हरपूल : करीम बेन्झिमा आणि व्हिनिशियस ज्यूनियर यांनी झळकावलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्याच्या सामन्यात रेयाल माद्रिदने लिव्हरपूलवर ५-२ असा विजय मिळवला.सामन्यात लिव्हरपूलने चांगली सुरुवात केली. डार्विन नुनेझ (चौथ्या मिनिटाला) आणि मोहम्मद सलाह (१४व्या मि.) यांनी गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, लयीत असलेल्या लिव्हरपूलने ही आघाडी फार काळ टिकू दिली नाही. व्हिनिशियसने (२१व्या मि. व ३६व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला भेदत दोन गोल केले आणि सामना २-२ असा बरोबरीत आणला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांमधील ही बरोबरी कायम होती.

दुसऱ्या सत्रात, माद्रिदने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. एडर मिलिटाओने (४७व्या मि.) गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर माद्रिदचा तारांकित खेळाडू बेन्झिमाने लिव्हरपूलच्या बचावफळीला स्थिरावू दिले नाही. बेन्झिमाने (५५व्या मि. व ६७व्या मि.) दोन गोल झळकावत माद्रिदला ५-२ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. माद्रिदच्या बचावफळीनेही लिव्हरपूलला गोल करण्याची कोणतीच संधी न देता आघाडी अखेपर्यंत कायम राखली आणि सामन्यात विजय नोंदवला. अन्य सामन्यात, नापोलीने आइनट्रॅक्ट फ्रँकफर्ट संघावर २-० असा विजय मिळवला.