पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारतीत संघाच्या सहभागाचा प्रश्न कायम राहिल्यास पुन्हा एकदा संमिश्र प्रारुप (हायब्रिड मॉडेल) पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो.

पाकिस्तानात खेळण्यावरून भारत सरकारने विरोध दर्शविल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) त्याविरोधात निर्णय घेण्यास सांगू शकणार नाही. त्यामुळेच गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेदरम्यान समोर आलेला ‘संमिश्र प्रारुप’ या पर्यायाचा पुन्हा विचार केला जाऊ शकतो, असे ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी समितीतील सूत्रांनी सांगितले.

‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्यांची सध्या दुबईत बैठक सुरू आहे. बैठकीच्या विषय पत्रिकेत हा मुद्दा नसला, तरी यावर चर्चा होऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) नवनिर्वाचित अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा आणि ‘आयसीसी’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची असल्याचे सांगितले.

हेही वाचा >>> T-20 विश्वचषकात लागू होणारा स्टॉप क्लॉक नियम काय आहे माहितीय? ६० सेकंदांची वेळ, दंड अन्…

यानंतरही, चॅम्पियन्स करंडक आयोजनाच्या एकूण घडामोडींची माहिती घेतल्यास ‘बीसीसीआय’ या संदर्भात कुठलाही निर्णय स्पर्धा जवळ आल्यानंतरच घेण्याची शक्यता आहे. अशा वेळी त्रयस्थ केंद्र म्हणून संयुक्त अरब अमिरातीचे नाव पुढे आल्यास ते डावलले जाणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे.

‘आयसीसी’च्या बैठकीत यावर प्रत्येक सदस्य आपले मत मांडू शकतो आणि त्यानंतर निर्णयासाठी त्यावर मतदान घेतले जाईल. परंतु, सदस्य राष्ट्राच्या सरकारने पाकिस्तानात खेळण्यास विरोध केला, तर ‘आयसीसी’ हस्तक्षेप करू शकत नाही. सरकारच्या निर्णयाविरोधात जाण्याची ‘आयसीसी’ची तयारी नाही. अशा वेळी ‘आयसीसी’ला पर्यायी केंद्राचा विचार करावा लागेल, असे एका अनुभवी पदाधिकाऱ्याने सांगितले.

अलीकडच्या काळात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या सर्व संघांनी पाकिस्तानचा दौरा केला आहे. हे तीनही दौरे यशस्वी झाले याचे दडपण या वेळी ‘बीसीसीआय’वर असू शकेल, असेही काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुत्सद्देगिरी ठरणार निर्णायक

भारताने पाकिस्तानात खेळण्यावरून दोन्ही देशांतील पदाधिकाऱ्यांकडून होणारी मुत्सद्देगिरी निर्णायक ठरणार आहे. याच वर्षी भारत-पाकिस्तान डेव्हिस चषक लढत पाकिस्तानात खेळवण्यात पाकिस्तानी संघटकांना यश आले होते. पाकिस्ताननेही एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवला होता. या सगळ्या गोष्टींचा विचार या वेळी करावा लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions trophy in pakistan hybrid model may consider if india refuses to play in pakistan zws