महिलांची सर्बियाशी बरोबरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या पुरुष संघाने चेस ऑलिम्पियाड स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत कॅनडाचा ३.५-०.५ असा धुव्वा उडवत विजयी सातत्य कायम राखले. भारतीय महिलांनी मात्र सर्बियाविरुद्ध बरोबरी पत्करली. या विजयासह भारताच्या पुरुषांनी सहा गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे, तर महिलांची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

विश्वनाथन आनंद, पी. हरिकृष्ण आणि के. शशिकिरण यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्याविरुद्धचे सामने आरामात जिंकले, तर विदीत गुजराथीला एव्हगेनी बारीव याच्याविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. विदीतने दोन प्याद्यांसाठी आपल्या घोडय़ाचा बळी दिला. त्यानंतरही बारीव्हने विदितवर सातत्याने दडपण राखले. विदितने सुरेख खेळ करत ७२व्या चालीनंतर ही लढत बरोबरी सोडवली.

महिलांमध्ये विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या रशियाला ३१व्या मानांकित उझबेकिस्तानने पराभवाचा धक्का दिला. चेस ऑलिम्पियाडच्या इतिहासातील हा सर्वात धक्कादायक पराभव ठरला आहे. त्यानंतर अव्वल स्थानी विराजमान झालेल्या भारतीय महिलांना मात्र अनपेक्षतिपणे २३व्या मानांकित सर्बियाविरुद्ध बरोबरी पत्करावी लागल्याने भारताची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.

कोनेरू हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका यांनी भारताला विजय मिळवून दिल्यानंतर ईशा करवडे आणि पद्मिनी राऊत यांना पराभव स्वीकारावा लागल्याने भारताला या सामन्यात बरोबरी पत्करावी लागली. त्यामुळे  या स्पर्धेतील पुरुष गटामध्ये भारताच्या आशा कायम आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chase olympiad tournament