वृत्तसंस्था, लंडन

युवा आक्रमकपटूंच्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर चेल्सीने ‘युएफा’ चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या लढतीत आयेक्स संघावर ५-१ अशी मात केली. या सामन्यात चेल्सीसाठी मार्क गुयू (वय १९ वर्षे), एस्टेवाओ (१८ वर्षे) आणि टायरिक जॉर्ज (१९ वर्षे) यांनीही गोल साकारले. चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात एका संघासाठी तीन किशोरवयीन खेळाडूंनी गोल करण्याची ही पहिली वेळ ठरली.

घरच्या मैदानावर खेळताना चेल्सीने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. त्यातच आयेक्सचा कर्णधार केनेथ टेलरला १७व्या मिनिटाला थेट लाल कार्ड मिळाल्याने चेल्सीची स्थिती अधिकच भक्कम झाली. पुढच्याच मिनिटाला युवा आघाडीपटू मार्क गुयूने गोल नोंदवत चेल्सीला आघाडी मिळवून दिली. यानंतर मोइसेस कैसेडोने (२७व्या मिनिटाला) चेल्सीची आघाडी आणखी वाढवली. मात्र, चेल्सीचा बचावपटू टोसिनकडून झालेल्या चुकीमुळे आयेक्सला ३३व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. यावर वुट वेघहोर्स्टने गोल नोंदवत आयेक्सच्या पुनरागमनाच्या आशा जागवल्या. परंतु मध्यंतरापूर्वीच चेल्सीला दोन पेनल्टी मिळाल्या. यावर प्रथम एंझो फर्नांडेझ, मग एस्टेवाओने गोल केला. त्यामुळे चेल्सीला ४-१ अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धात ४८व्या मिनिटाला टायरिक जॉर्जने चेल्सीसाठी आणखी एक गोल नोंदवला. यानंतर चेल्सीचेच वर्चस्व राहिले, पण त्यांना गोलसंख्या वाढवता आली नाही.

अन्य लढतीत, चॅम्पियन्स लीगमधील सर्वांत यशस्वी संघ रेयाल माद्रिदने युव्हेंटसवर १-० असा निसटता विजय मिळवला. मध्यंतराच्या गोलशून्य बरोबरीनंतर उत्तरार्धात मध्यरक्षक जुड बेलिंगहॅमने (५७व्या मिनिटाला) निर्णायक गोल केला. दुसरीकडे, लिव्हरपूरलने आइनट्रॅक फ्रॅन्कफर्टवर ५-१ अशी मात केली. लिव्हरपूलकडून हुगो एकिटिके (३५व्या मि.), कर्णधार व्हर्जिल व्हॅन डाइक (३९व्या मि.), इब्राहिमा कोनाटे (४४व्या मि.), कोडी गाकपो (६६व्या मि.) आणि डॉमिनिक सोबोझलाई (७०व्या मि.) यांनी गोल केले. तसेच जर्मनीतील बलाढ्य संघ बायर्न म्युनिकने क्लब ब्रूजवर ४-० असा, तर स्पोर्टिंग लिस्बनने मार्सेवर २-१ असा विजय मिळवला.

१८ : चेल्सीसाठी ब्राझीलचा १८ वर्षीय आक्रमकपटू एस्टेवाओने गोल नोंदवला. त्यामुळे चॅम्पियन्स लीगमध्ये चेल्सीसाठी गोल करणारा तो सर्वांत युवा खेळाडू ठरला. एस्टेवाओने मार्क गुयूचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे, १९ वर्षीय गुयूने याच सामन्यात हा विक्रम केला होता.