भारताच्या युकी भांबरीचे चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. कॅनडाच्या व्हासेक पोस्पीसिलने त्याला ६-३, ६-३ असे दोन सरळ सेट्समध्ये हरवत उपांत्य फेरी गाठली. युकीला ६९ मिनिटांच्या लढतीत अपेक्षेइतके कौशल्य दाखवता आले नाही. त्याच्या खेळात फोरहँड फटक्यांच्या अचूकतेचा अभाव दिसून आला. मिळालेल्या संधींचा त्याला लाभ घेता आला नाही. दोन्ही सेट्समध्ये त्याची सव्‍‌र्हिस ब्रेक झाली. व्हासेकने केलेल्या क्रॉसकोर्ट फटक्यांपुढे त्याचा बचाव निष्प्रभ ठरला. सामना संपल्यानंतर भांबरी म्हणाला, ‘‘अपेक्षेइतका प्रभावी खेळ करण्यात मी कमी पडलो. व्हासेकने खूपच सुरेख खेळ केला. या सामन्यातील अनुभव मला भावी कारकिर्दीसाठी उपयुक्त ठरणार आहे. व्हासेकला आता अग्रमानांकित स्टानिस्लास वॉवरिंका याच्याशी खेळावे लागणार आहे. वॉवरिंकाने स्लोव्हाकियाच्या अलिझाझ बेदेनीचे आव्हान ६-२, ६-१ असे लीलया परतवले. त्याने पहिल्या सेटमध्ये एकदा तर दुसऱ्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला.