पुणे : दिव्या देशमुखच्या यशामुळे भारतालाच नव्हे, तर महाराष्ट्राला बुद्धिबळासारख्या कठीण खेळात आणखी एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. संपूर्ण स्पर्धेत दिव्याने दाखवलेली भक्कम मानसिकता लक्षवेधक ठरली, अशा शब्दांत ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी विश्वचषक विजेत्या दिव्याचे कौतुक केले.
‘‘लहान वयात इतके मोठे जागतिक वैयक्तिक यश मिळविणे हे कौतुकास्पदच आहे. कोनेरू हम्पी पाठोपाठ आता दिव्याचीही जागतिक स्तरावरील दिग्गज खेळाडूंमध्ये गणना होईल. याचा नक्कीच एक ग्रँडमास्टर आणि प्रशिक्षक म्हणून मला अभिमान आहे,’’ असेही जागतिक सांघिक बुद्धिबळ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या महिला संघाचे प्रशिक्षक असलेल्या कुंटे यांनी सांगितले.
‘‘दिव्या कमालीच्या आत्मविश्वासाने खेळली आणि ती तशीच खेळते. सांघिक स्पर्धेच्या वेळीही तू आमची महत्त्वाची खेळाडू आहेस, तुला सर्व अकरा लढती खेळायच्या आहेत असे मी तिला सांगितले होते. इतक्या मोठ्या स्पर्धेत असे आव्हान मिळाल्यावर खेळाडू दडपणाखाली येऊ शकतो. मात्र, दिव्याने कमालीच्या धडाडीने हे आव्हान स्वीकारले आणि आत्मविश्वासाने एकेक आव्हान परतवून लावत सुवर्णपदकही मिळविले. लहान वयातच मोठी संधी मिळाल्यावर दिव्याने जबाबदारीने स्वतःला घडवले. प्रत्येक लढत, स्पर्धेनंतर ती अधिक प्रगल्भ वाटू लागली. प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत कसे खेळायचे हे ती चांगले जाणते. यासाठी असलेली भक्कम मानसिकता तिने या स्पर्धेतील प्रत्येक लढतीत दाखवली,’’ असे कुंटे म्हणाले.
दिव्याच्या खेळण्याच्या शैलीविषयी बोलताना कुंटे यांनी या वेळी तिच्या संयमाला दाद दिली. ‘‘दिव्याच्या खेळात एरवी आक्रमकता दिसून येते. मात्र, या स्पर्धेत चीनच्या तसेच भारताच्या हम्पीसारख्या अनुभवी खेळाडूसमोर ती डगमगली नाही. ‘वेट अँड वॉच’ पद्धतीने खेळताना हम्पी कायम प्रतिस्पर्ध्यांवर भारी पडते. मात्र, त्याच पद्धतीने खेळत दिव्याने या वेळी हम्पीलाही मागे टाकले. हम्पीसारख्या खेळाडूसमोर इतका संयम दाखवणे निश्चित कठीण होते,’’ असे कुंटे यांनी सांगितले.
या कामगिरीमुळे आता दिव्याला ग्रँडमास्टर किताबही मिळाला. तसेच पुढील वर्षी ती ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतही खेळणार आहे. या स्पर्धेतही दिव्या चमकेल इतका विश्वास तिने निर्माण केला असल्याचेही कुंटे म्हणाले.
दिव्याची कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातीलच नाही, तर भारतातील मुलींना बुद्धिबळ खेळण्यासाठी हे विजेतेपद प्रेरित करेल. अनेक मुली बुद्धिबळ खेळायला पुढे येतील आणि यातून अनेक दिव्या घडतील. – अभिजित कुंटे, ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू.