ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने रांची कसोटीत द्विशतकी खेळी साकारणाऱया चेतेश्वर पुजाराचे कौतुक केले. पुजारामध्ये आम्हाला राहुल द्रविड दिसतो. रांची कसोटीतील त्याची खेळी पाहून तो सध्याच्या भारतीय संघाची भिंत बनला आहे यात काहीच शंका नाही, असे गौरवोद्गार क्लार्कने काढले आहेत.

चेतेश्वर पुजाराने रांची कसोटीत मैदानात टीच्चून फलंदाजी करत ५२५ चेंडूंचा सामना करत २०२ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. पुजाराच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर आघाडी घेता आली. एका इनिंगमध्ये पाचशेहून अधिक चेंडूंचा सामना करणारा पुजारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. याआधी राहुल द्रविडने ४९५ चेंडू एका इनिंगमध्ये खेळले होते. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत क्लार्क म्हणाला की, ”चेतेश्वर पुजारा आणि राहुल द्रविड यांच्या खेळीत कमालीचे साम्य दिसून येते. पुजाराने रांचीत द्विशतकी खेळी साकारली नसती तर भारताला कसोटी गमवावी लागली असती. त्यामुळे पुजारा नक्कीच भारतीय संघाच्या फलंदाजीची मजबूत भींत बनला आहे. द्रविडसारखाच तो स्वत:चा नैसर्गिक खेळ करत जातो आणि मोठ्या खेळी साकारतो”

 

भारताचा कर्णधार विराट कोहली याला कसोटीच्या पहिल्याच दिवशी क्षेत्ररक्षणावेळी चौकार अडवताना उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कोहलीला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे कसोटीचा दुसरा दिवस टीम इंडियाला कोहलीच्या अनुपस्थितीत खेळावा लागला होता. यावरही क्लार्कने आपले मत व्यक्त केले.

कोहलीची मैदानात उपस्थित असणे खूप महत्त्वाचे होते. मैदानातील आपली उपस्थिती संघासाठी किती महत्त्वाची आहे, याची कल्पनाही कोहलीला आहे. तो नेहमी शंभर टक्के देण्याच्या प्रयत्नात असतो. तो पूर्णपणे फिट असेल आणि अखेरच्या सामन्यात तो खेळताना दिसेल अशी आशा असल्याचे क्लार्क म्हणाला.