Cheteshwar Pujara Gabba Test: भारतीय संघातील स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. गेल्या २ वर्षांपासून तो भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होता. पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर त्याने रविवारी (२४ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पुजारान आपल्या एक्स अकाऊंटवरून भावुक पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. राहुल द्रविडनंतर पुजाराला भारतीय कसोटी संघाची भिंत म्हटलं जात होतं. त्याने २०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गाबाच्या मैदानावर केलेली खेळी कुठलाही क्रिकेट चाहता विसरू शकणार नाही.

हेल्मेट, हात अन् छाती..११ वेळा चेंडू अंगाला लागला; पण पुजारा गाबा कसोटीत ‘भिंतीसारखा खंबीर उभा राहिला

भारतीय संघ परदेशात खेळताना जेव्हा जेव्हा अडचणीत असायची तेव्हा पुजारा एक बाजू शेवटपर्यंत धरून ठेवायचा. कासवगतीने धावा करणं आणिा गोलंदाजांना घाम फोडणं हे त्याला चांगलं जमायचं. २०१८-१९ आणि २०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात त्याने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. २०२०-२१ दौऱ्यावर गाबा कसोटी सामना भारतीय संघाच्या हातून जवळजवळ निसटला होता. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज बाऊंसरवर बाऊंसर मारत होते. पण पुजाराने हे सर्व चेंडू स्वत:च्या अंगाला मारून घेतले. हात, पाय, छाती आणि हेल्मेट अशी एकही जागा शिल्लक उरली नव्हती,जिथे पुजाराला चेंडू लागला नसेल. मात्र, तरीही त्याने मैदान सोडलं नव्हतं. तो पंतसोबत उभा राहिला आणि भारतीय संघाला सामना जिंकून दिला होता.

भारतीय फलंदाज आधी हा सामना वाचवण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे पुजारावर विकेट न टाकता शेवटपर्यंत किल्ला लढवण्याची जबाबदारी होती. पुजाराने या डावात २११ चेंडूंचा सामना केला आणि ५६ धावा केल्या होत्या. पुजारामुळे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज थकले होते. याचा ऋषभ पंतने चांगला फायदा घेतला आणि भारतीय संघासाठी विजय खेचून आणला.

सामन्यात नेमकं काय घडलं होतं?

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव ३६९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्या डावात ३३६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २९४ धावा केल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३२७ धावा करायच्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने ३ गडी राखून पूर्ण केले होते.