शेन्झेन (चीन) : सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीतील भारताच्या आघाडीच्या जोडीला चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत भारतीय जोडीला किम वोन हो आणि सियो सेयुंग जेइ या कोरियाच्या अग्रमानांकित जोडीकडून हार पत्करावी लागली.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सात्त्विक-चिराग जोडीला ४५ मिनिटे चाललेल्या अंतिम लढतीत १९-२१, १५-२१ अशा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय जोडीला सलग दुसऱ्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय जोडी हाँगकाँग स्पर्धेत उपविजेती राहिली होती.

त्यानंतर चीन मास्टर्स स्पर्धेत अंतिम फेरीपूर्वी भारतीय जोडीने एकही गेम गमावला नाही. किम आणि सियो या जोडीचा २०२५ च्या हंगामातील हा नववा अंतिम सामना होता. यापूर्वीच त्यांनी सहा विजेतेपदे मिळवली आहेत. यामध्ये पॅरिसमध्ये झालेली जागतिक स्पर्धा, तसेच इंग्लंड आणि इंडोनेशिया स्पर्धेच्या जेतेपदाचाही समावेश आहे.

चीन मास्टर्सच्या अंतिम लढतीत पहिल्या गेमच्या मध्यंतरापर्यंत भारताकडे ११-७ अशी आघाडी होती. मग, त्यांनी ही आघाडी १४-८ अशी वाढवली. यानंतर कोरियन जोडीने पुनरागमन करत गेम १५-१५ असा बरोबरीत आणला. मग, कोरियन जोडीने १९-१७ अशी आघाडी मिळवली. भारतीय जोडीने पुन्हा १९-१९ अशी बरोबरी साधली. परंतु कोरियन जोडीने सलग दोन गुणांची कमाई करीत पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीकडे ८-६ अशी आघाडी होती. मग कोरियन जोडीने पुनरागमन करताना गेमच्या मध्यंतरापर्यंत एका गुणाची आघाडी घेतली. गेमच्या दुसऱ्या टप्प्यातही कोरियन जोडीने भारताच्या चुकांचा फायदा घेत आघाडी आधी १५-११ आणि मग १७-१४ अशी वाढवली. यानंतर भारतीय जोडीला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी न देता त्यांनी गेमसह सामना जिंकला.