आयपीएलनंतर आगामी टी-२० विश्वचषकावर सर्वांच्या नजरा आहेत. गेल्या दशकभरात भारताने एकही आयसीसी ट्रॉफी पटकावलेली नाही, त्यामुळे या टी-२० विश्वचषकावर भारत आपलं नाव कोरेल अशी सर्वांना आशा आहे. पुढील विश्वचषक डोळ्यासमोर असतानाही सर्वांच्याच मनात २०२३ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामन्यातील पराभव अजूनही तसाच आहे. विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्यापासून एक पाऊल दूर असलेल्या भारताला ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट कामगिरी करत नमवले आणि भारताला न पचवणारा धक्का दिला. पण या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने कशी तयारी केली होती, कोणते डावपेच आखले होते, हे आता डेव्हिड वॉर्नरने सांगितले आहे.

आर अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवर डेव्हिड वॉर्नरसोबतच्या मुलाखतीचा व्हीडिओ शेअर केला आहे. अश्विनने ‘कुट्टी स्टोरीज विथ अॅश’ या सिरीजमध्ये अनेक क्रिकेटपटूंची मुलाखत घेतली आहे. यामध्ये आज त्याने वॉर्नरची मुलाखत घेतली आणि ज्याचा व्हीडिओ त्याने शेअर केला आहे. यामध्ये वॉर्नरने अनेक विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. भारत आता दुसरं घर असल्याचा उल्लेखही त्याने केला, तर सोबतच आयपीएलचा भारतात सामने खेळताना कसा फायदा होतो, हेही त्याने सांगितले. वनडे वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाच्या रणनीतीबद्दलही त्याने सांगितले.

वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अनपेक्षित कामगिरी करत भारताला नमवले. वॉर्नर याविषयी सांगताना म्हणाला, “ऑस्ट्रेलियन गेम प्लॅन भारतात वापरणं. अहमदाबाद आणि मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड यांच्यात साम्य आहे. दोन्ही मैदानं प्रचंड आकाराची आहेत. सीमारेषा दूरवर आहे. चौकार-षटकार मारणं कठीण आहे. त्यामुळे एकेरी-दुहेरी धावांवर भर द्यावा लागतो. वर्ल्डकप फायनलला आम्ही एमसीजीवर खेळताना जे डावपेच आखतो तसेच अहमदाबादमध्ये आखले. चेंडू खेळून दोन धावा काढायचा. गोलंदाजी करताना छातीच्या दिशेने मारा करायचा आणि मोठ्या बाऊंड्रीजना लक्ष्य करणं हे डावपेच होते. आयपीएलमुळे खेळपट्ट्या, प्रेक्षक वर्ग समजून घेण्यास मदत मिळाली. काळ्या मातीची खेळपट्टी आणि लाल मातीची खेळपट्टीमधील फरक समजून घेण्यास मदत झाली.”