प्रीत ब्रार, रवी बिश्नोई आणि के. एल. राहुल यांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुवर धक्कादायक विजय मिळवणाऱ्या पंजाब किंग्जचा आत्मविश्वास आता दुणावला आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या बाद फेरीची आशा कायम राखणाऱ्या पंजाबपुढे रविवारी दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान समोर आहे.
बेंगळूरुविरुद्धच्या पंजाबच्या विजयात फलंदाजीचे श्रेय राहुलच्या ९१ धावांच्या खेळीला जाते. तसेच पदार्पणवीर हरप्रीत (३/१९) आणि बिश्नोई (२/१९) यांच्या फिरकीला जाते. पंजाबने आतापर्यंत सातपैकी तीन विजय मिळवले आहेत. दिल्लीने याआधीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला धूळ चारली असून, त्यांच्या खात्यावर सातपैकी पाच विजय जमा आहेत.
दिल्ली कॅपिटल्स
मिश्राला संधी?
सलामीवीर शिखर धवन (एकूण ३११ धावा) आणि पृथ्वी शॉ (एकूण २६९ धावा) यांच्यावर दिल्लीच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त आहे. या दोघांनी मिळून ७१ चौकार आणि १५ षटकारांच्या साहाय्याने पाच अर्धशतके झळकावली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ऋषभ पंत हे सामन्याचे चित्र पालटू शकणारे आणखी दोन खंदे फलंदाज दिल्लीकडे आहेत. वेगवान माऱ्याची तुलना केल्यास दिल्लीकडे आवेश खान (एकूण १३ बळी), कॅगिसो रबाडा आणि इशांत शर्मा असे भक्कम त्रिकूट आहे. अनुभवी लेग-स्पिनर अमित मिश्राचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. अक्षर पटेल आपले अष्टपैलुत्व सिद्ध करीत आहे.
पंजाब किंग्ज :
राहुलवर भिस्त
पंजाबच्या फलंदाजीची धुरा एकूण ३३१ धावा खात्यावर असणाऱ्या राहुलवर आहे. ख्रिस गेलमध्ये सातत्याचा अभाव आहे. मयांग अगरवाल सातत्याने योगदान देत आहे. हरप्रीतने अष्टपैलू गुणवत्ता सिद्ध केली आहे. गोलंदाजीच्या विभागातील मोहम्मद शमीने सात सामन्यांत आठ बळी मिळवून आपली भूमिका चोख बजावली आहे. परंतु लिलावात लक्षणीय भरारी घेणारे झाये रिचर्ड्सन आणि रीले मेरेडिथ मात्र महागडे ठरत आहेत. मागील दोन सामन्यांत मध्यमगती गोलंदाज ख्रिस जॉर्ड्नचा पर्याय यशस्वी ठरत आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील विशेषज्ञ फलंदाज डेव्हिड मलान अजूनही संधीच्या प्रतीक्षेत आहे.
’ वेळ : सायंकाळी ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी