मुंबई : एकदिवसीय विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळत असल्याने आमच्यावर दडपण निश्चित होते. त्यातच क्षेत्ररक्षणातही आमच्याकडून बऱ्याच चुका झाल्या. मात्र, आम्ही धैर्य गमावले नाही, असे भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९७ धावा केल्या आणि नंतर न्यूझीलंडचा डाव ३२७ धावांवर संपुष्टात आणला. ‘‘वानखेडेवर मी खूप क्रिकेट खेळलो आहे. तुम्ही कितीही धावा केल्यात तरी त्या पुरेशा वाटत नाहीत.
हेही वाचा >>> AUS vs SA Semi-Final: ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक! दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले, कांगारूंचा तीन गडी राखून रोमहर्षक विजय
आम्हाला आखलेल्या योजनेनुसार खेळायचे होते. उपांत्य सामना असल्याने दडपण असणार याची कल्पना आम्हाला होती. मैदानात खराब क्षेत्ररक्षण करूनही आम्ही धैर्य गमावले नाही. डॅरेल मिचेल आणि केन विल्यम्सन चांगली फलंदाजी करत होते. आम्हाला गडी बाद करण्याची आवश्यकता होती, तेव्हा शमीने निर्णायक कामगिरी केली,’’असे रोहित म्हणाला. तसेच उपांत्य सामना असूनही इतकी मोठी धावसंख्या उभारल्याबद्दल रोहितने भारतीय फलंदाजांचे कौतुक केले. ‘‘संघातील सुरुवातीचे पाच-सहा फलंदाज चांगल्या लयीत आहेत. त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्यांनी त्याचा फायदा घेतला आहे. श्रेयस अय्यरची कामगिरी आमच्यासाठी महत्त्वाची होती. गिलही चमक दाखवत आहे. कोहली ज्यासाठी ओळखलो जातो, तेच त्याने केले,’’ असे रोहितने सांगितले.