Dewald Brevis Becomes Most Expensive Player: बेबी एबी म्हणून आपली ओळख तयार करणारा डेवाल्ड ब्रेविसने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डेवाल्ड ब्रेव्हिस हा दक्षिण आफ्रिकेच्या टी२० लीग SA20 मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या SA20 2026 च्या लिलावात, प्रिटोरिया कॅपिटल्सने त्याच्यावर विक्रमी बोली लावत संघात सामील केलं. कॅपिटल्स संघाकडून लिलावासाठी उपस्थित असलेल्या सौरव गांगुलीने सुपर किंग्स संघाला मोठा धक्का दिला.
जोहान्सबर्गमधील लिलावादरम्यान, २२ वर्षीय डेवाल्ड ब्रेव्हिसला सर्वाधिक मागणी होती. ब्रेव्हिसने अलीकडेच आयपीएल आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध चमकदार कामगिरी केली होती, ज्यामुळे सर्व फ्रँचायझींनी त्याच्यावर मोठी बोली लावली. प्रिटोरिया कॅपिटल्स संघाने त्याला खरेदी करण्यासाठी सर्वाधिक बोली लावली आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. एडेन मारक्रमवर देखील मोठी बोली लागली.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिससाठी SA20 लिलावात फ्रँचायझींमध्ये जोरदार लढत झाली. प्रिटोरिया कॅपिटल्स संघ बोली जिंकण्यात यशस्वी झाला. प्रिटोरिया कॅपिटल्सने डेवाल्ड ब्रेव्हिससाठी १६ मिलियन रँड (८.०६ कोटी रुपये) खर्च केले. यासह, तो SA20 लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला.
सुपर किंग्जने लिलावात आक्रमक सुरुवात केली आणि लवकरच बोलीची किंमत ३० लाख रँड ओलांडली. मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि पार्ल रॉयल्सनेही बोली लावण्यात भाग घेतला, परंतु नंतर त्यांनी माघार घेतली. शेवटी कॅपिटल्सने बाजी मारली आणि ब्रेविसला संघात सामील केलं.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज आणि टी-२० कर्णधार एडेन मारक्रमनेही SA20 २०२६ च्या लिलावात इतिहास घडवला. डर्बन सुपर जायंट्सने त्याला ७ कोटी रुपयांच्या विक्रमी रकमेत विकत घेतले, जी SA20 मधील आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी बोली आहे. सनरायझर्स ईस्टर्न केपसाठी यापूर्वी दोनदा SA20 विजेतेपद जिंकलेल्या मारक्रमने लिलावात उतरण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटले.
मारक्रमने २०२३ आणि २०२४ मध्ये सनरायझर्स ईस्टर्न केपला सलग दोन जेतेपदे जिंकून दिली आणि २०२५ च्या हंगामात तिसरे स्थानही पटकावले. एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर-१ गोलंदाज केशव महाराजही यावेळी प्रिटोरिया कॅपिटल्स संघात सामील झाला. केशव महाराजसाठी प्रिटोरिया कॅपिटल्सने १.७ दशलक्ष रँड खर्चून संघात घेतलं.
क्विंटन डी कॉकसाठी लावलेल्या बोलीमध्ये संघांमध्ये अटीतटीची स्पर्धा झाली आणि शेवटी सनरायझर्स ईस्टर्न केपने त्याला २.४ दशलक्ष रँडमध्ये विकत घेतले. युवा वेगवान गोलंदाज क्वेना म्फाका १.६ दशलक्ष रँडमध्ये डर्बन सुपर जायंट्समध्ये सामील झाला.