Dickie Bird Umpire who stood in 1983 World Cup final Dies at 92: क्रिकेट दुनियेतील महान अंपायर डिकी बर्ड यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. डिकी बर्ड यांच्या निधनाची बातमी इंग्लंडच्या यॉर्कशायर काऊंटी क्लबने केली आहे. आपल्या दीर्घ कारकिर्दीत बर्ड हे जगातील सर्वोत्तम पंचांपैकी एक मानले जात असत.
डिकी बर्ड यांनी सलग तीन विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये पंच म्हणून भूमिका बजावली होती, ज्यात १९८३ च्या ऐतिहासिक अंतिम सामन्याचा समावेश आहे. ज्यामध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजवर मात केली होती. १९८३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये डिकी बर्ड यांनी अमरनाथ यांच्या गोलंदाजीवर मायकल होल्डिंगला बाद दिलं होतं आणि वेस्ट इंडिजने शेवटची विकेट गमावली होती.
डिकी बर्ड यांनी १९७३ ते १९९५ या काळात तब्बल ६६ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. बर्ड यांचे यॉर्कशायर क्रिकेट क्लबशी घनिष्ठ संबंध होते. सुरुवातीला त्यांनी या क्लबकडून एक टॉप ऑर्डर फलंदाज म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आणि नंतर क्लबचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं.
डिकी बर्ड यांचं पूर्ण नाव हेरॉल्ड डेनिस बर्ड असं आहे. यॉर्कशायर क्रिकेट क्लबसाठी हेरॉल्ड ‘डिकी’ बर्ड यांनी तब्बल नऊ वर्षं खेळाडू म्हणून खेळले. त्यानंतर त्यांनी थोडा काळ प्रशिक्षक आणि क्लब क्रिकेटमध्येही काम पाहिलं. यॉर्कशायर क्रिकेट क्लबने त्यांच्या निधनाची दु:खद बातमी चाहत्यांबरोबर पोस्टद्वारे शेअर केली.
कोण होते डिकी बर्ड? खेळाडू ते जागतिक दर्जाच्या पंचापर्यंतचा प्रवास
१९ एप्रिल १९३३ रोजी जन्मलेले डिकी बर्ड यांनी खेळाडू म्हणून लिसेस्टरशायरकडूनही क्रिकेट खेळलं होतं. परंतु दुखापतीमुळे त्यांना अवघ्या ३२व्या वर्षी क्रिकेटला अलविदा करावं लागलं. ९३ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी ३३१४ धावा केल्या, त्यात दोन शतकं आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांचा फलंदाजीतील सरासरी २०.७१ अशी होती.
पुढे स्वतःच्या खेळाडू म्हणून यशाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. “जर मी फलंदाज म्हणून स्वतःवर तसा विश्वास ठेवला असता जसा पंच म्हणून ठेवतो, तर चित्र वेगळं असतं. माझ्याकडे क्षमता होती, हे मी सांगू शकतो. जर नेट्समध्ये माझी आणि जेफ्री बॉयकॉटची तुलना झाली असती, तर तुम्ही माझी कसोटी क्रिकेटसाठी निवड केली असती. रे इलिंगवर्थ यांनीदेखील माझी फलंदाजी पाहून कौतुक केलं होतं,” असं त्यांनी ‘द क्रिकेटर’ मासिकाला नोव्हेंबर १९९८ मधील त्यांच्या पंच म्हणून अखेरच्या सामन्यात सांगितलं होतं.
१९७० साली डिकी बर्ड यांनी पंच म्हणून पदार्पण केलं. १९७३ मध्ये लीड्स येथे इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात त्यांनी पहिल्यांदाच पंच म्हणून काम पाहिलं. जून १९९६ मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या इंग्लंड वि. भारत कसोटी त्यांचा पंच म्हणून अखेरचा सामना होता. गांगुली-द्रविड यांचा तो पहिला कसोटी सामना होता.
डिकी बर्ड यांना सामन्यात निरोप देण्यासाठी खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला आणि संपूर्ण प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानले होते. हा क्षण पाहून बर्ड यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
