Dinesh Karthik hat-trick of sixes in SA20 : भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकचे एसएटी-२० स्पर्धेतील पहिले अर्धशतक त्याचा संघ पार्ल रॉयल्सला मदत करू शकले नाही, ज्याला जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला, कार्तिकने ३९ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. दरम्यान या खेळीत त्याने सलग तीन षटकार मारले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्तिकचे अर्धशतक ठरले व्यर्थ –

दिनेश कार्तिकशिवाय रुबिन हरमनने २८ धावांचे योगदान दिले. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १५० धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या ५५ चेंडूत ८७ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सुपर किंग्ज संघाने १७.५ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा करून सहज विजयाची नोंद केली.

पार्ल रॉयल्सच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. जो रूटच्या जागी संघात समाविष्ट झालेला सॅम हेन दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. सुपर किंग्जचा ऑफस्पिनर डोनोव्हान फरेराने शानदार गोलंदाजी करत ३ षटकात २३ धावा देत ३ विकेट्स घेतले. त्याच्याशिवाय लुथो सिपामालानेही प्रभावी कामगिरी करत ३ विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पार्ल रॉयल्ससाठी लुआन-ड्रे प्रिटोरियस (११ चेंडूत १९ धावा) आणि रुबिन हरमन (२६ चेंडूत २८ धावा) यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.

हेही वाचा – VIDEO: आधी हँडशेकला नकार, आता चॉकलेट आणि फुलं; उझबेकिस्तानच्या बुद्धिबळपटूने मागितली भारताच्या वैशालीची माफी

दिनेश कार्तिकने मारले सलग तीन षटकार –

दिनेश कार्तिकने अडचणीत सापडलेल्या पार्ल संघसाठी दमदार अर्धशतक झळकावले. कार्तिकने निदाहास ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध मारलेल्या षटकाराच्या शैलीत विहान लुब्बेला १३व्या षटकातील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग ३ षटकार ठोकले. त्याची फलंदाजी बघता त्याला क्वचितच कोणी निवृत्त खेळाडू म्हणेल. मात्र, दुसऱ्या टोकाला त्याला इतर कोणत्याही फलंदाजाकडून फारशी साथ मिळाली नाही. या सामन्यात पार्ल रॉयल्सचे दोन महत्त्वाचे खेळाडू जो रूट आणि कर्णधार डेव्हिड मिलर यांची उणीव भासली. कर्णधार मिलर नवजात मुलाच्या जन्मामुळे संघासोबत नव्हता.

फाफ डु प्लेसिसने मिळवून दिला विजय –

फाफ डु प्लेसिसने आपल्या खेळीत चार चौकार आणि सात षटकार मारले. या विजयासह सुपर किंग्जने प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले आहे. सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे, परंतु आता तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स इस्टर्न केपसारखेच १९ गुण आहेत. अधिक बोनस गुण मिळाल्यामुळे गतविजेता सनरायझर्स सुपर किंग्जच्या पुढे तिसऱ्या स्थानावर आहे. रॉयल्स संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच पक्के केले आहे.

हेही वाचा – INDW vs ENGW: भारताच्या लेकींची U19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक, उपांत्य फेरीत इंग्लंडचा उडवला धुव्वा; ५ षटकं राखून मिळवला विजय

क्वालिफायर १ मध्ये पार्ल रॉयल्सचा सामना ४ फेब्रुवारी रोजी एमआय केपटाऊनशी होईल. विजयी संघ ८ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम फेरीत पोहोचेल. त्याचवेळी, प्लेऑफमधील उर्वरित दोन स्थानांसाठी सनरायझर्स, सुपर किंग्ज आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. प्रिटोरिया कॅपिटल्सला शुक्रवारी एमआय केपटाऊनविरुद्ध विजयाची नोंद करावी लागेल, तर शनिवारी सनरायझर्स आणि पार्ल रॉयल्स एकमेकांसमोर उभे ठाकतील. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेले संघ ५ फेब्रुवारीला एलिमिनेटर सामना खेळतील, तर दुसऱ्या दिवशी क्वालिफायर २ होणार आहे, ज्यामध्ये एलिमिनेटर विजेते आणि क्वालिफायर १ गमावलेले संघ आमनेसामने येतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinesh karthik hat trick six during joburg super kings vs paarl royals match in sa20 video viral vbm