जवळपास दीड वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झुंजार शतक साकारले. इंग्लंडच्या वेगवान माऱ्याचा आणि चाहत्यांच्या टोमण्यांचा सक्षमपणे मुकाबला करत स्मिथने शतकी खेळी केली. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात स्टेडियममधील चाहत्यांनी सर्व हद्दच पार केली. वर्षभराच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नर, कॅमरुन बेनक्रॉफ्ट आणि स्टीव स्मिथची स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांनी स्लेजिंग केली. स्मिथला डिवचण्यासाठी इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याचा मुखवटा परिधान केला होता.ज्यामध्ये स्मिथचा रडका चेहरा होता. स्मिथने स्लेजिंग करणाऱ्या इंग्लंडच्या प्रेक्षकांना झुंजार शतकी खेळी करत प्रत्युत्तर दिलं. स्मिथने १४४ धावांची शतकी खेळी केली. स्मिथचे कसोटीमधील हे २४ वे शतक होते.

इंग्लंडच्या चाहत्यांनी डेव्हिड वॉर्नर, कॅमरुन बेनक्रॉफ्ट आणि स्टीव स्मिथची चांगलीच खिल्ली उडवली. अवघ्या दोन धावांवर बाद झालेला वॉर्नर पॅव्हेलियनकडे परत जात असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याला सॅण्ड पेपरचे तुकडे दाखवत त्याची हुर्यो उडवली.

२०१७ साली मार्च महिन्यामध्ये झालेल्या कसोटीत डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडू कुरतडल्याचा आरोप सिद्ध झाला होता. त्यानंतर या तिन्ही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. बंदी उठवल्यानंतर या वर्षी वॉर्नर आणि स्मिथ यांनी विश्वचषक स्पर्धेतून मैदानात पुरागमन केलं आहे.

दरम्यान विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये भारतीय प्रेक्षकांनी स्मिथला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली याने भारतीय चाहत्यांना स्मिथला डिवचण्याऐवजी टाळ्या वाजवून चांगल्या खेळाला प्रोत्साहन देत टाळ्या वाजवा असा इशारा केला होता. यावेळी विराटच्या खिळाडूवृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.