क्रिकेटच्या मैदानात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया कट्टर हाडवैरी मानले जातात. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांचा हा मुकाबला दर्जेदार खेळाच्या बरोबरीने शेरेबाजी, टोमणे, किस्से यांनीही रंगतो. पण मैदानाबाहेर हे सगळं बाजूला ठेऊन माणुसकी जपण्याचं अनोखं उदाहरण इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयन बोथम यांच्याबाबतीत घडलं आहे.
बोथम ऑस्ट्रेलियात फिरायला गेले होते. त्यावेळी ते चुकून मगरींचा अधिवास असणाऱ्या पाण्यात पडले. त्यांच्या जीवाला धोका होता. पण ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू मर्व्ह ह्यूज यांनी प्रसंगावधान राखून बोथम यांचा जीव वाचवला आहे. ह्यूज यांच्याप्रति बोथम यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
बोथम चार दिवसांसाठी ऑस्ट्रेलियात गेले होते. मॉयले नदीजवळच्या बारामुंडी भागात ते गेले होते. डार्विन शहरापासून साधारण २०० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. मासेमारीसाठी गेलेले असताना ते गडबडीत पाण्यात पडले. यामुळे त्यांच्या छातीला मार बसला. त्या पाण्यात मगरींचा वावर असतो. बोथम पाण्यात पडल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. मर्व्ह ह्यूज यांना या धोक्याची त्वरित जाणीव झाली. त्यांनी तातडीने पाण्यात उडी घेत बोथम यांना बाहेर काढलं.
‘सुदैवाने माझा जीव वाचला. ज्या वेगात मी पाण्यात पडलो, त्यापेक्षा वेगाने मला मर्व्हने बाहेर काढलं. मी खाली पडलो तेव्हा मला काही मगरी दिसल्या. त्यांच्यासाठी मी आयतं खाद्य ठरलो असतो. नशीब बलवत्तर म्हणून मला विचार करायला वेळ मिळाला नाही, त्याआधीच मला बाहेर काढलं गेलं’, असं बोथम यांनी सांगितलं. ते एका छोट्या बोटीतून दुसऱ्या बोटीत जात असताना त्यांच्या चपला दोरीत अडकल्या. त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. ६८वर्षीय बोथम यांच्या छातीला, बरगड्यांना चांगलाच मार बसला.
‘मर्व्ह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मला अतिशय वेगात बाहेर काढलं. मी आता बरा आहे’, असं त्यांनी सांगितलं. ८०च्या दशकात अॅशेस मालिकेदरम्यान बोथम आणि ह्यूज यांच्यातील द्वंद्व गाजलं होतं.
© IE Online Media Services (P) Ltd