यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरने (६७ चेंडूत नाबाद १०१ धावा) साकारलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर इंग्लंडने सोमवारी टी-२० विश्वचषकात श्रीलंकेवर २६ धावांनी मात केली. सलग चौथ्या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला. या विजयासह इंग्लंडचा कप्तान ईऑन मॉर्गनने मोठा विक्रम नावावर केला आहे. त्याने भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉर्गन आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याने याबाबतीत भारताचा माजी कर्णधार धोनी आणि अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानला मागे टाकले. मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाने ६८ सामन्यांत ४३ सामने जिंकले आहेत. यात दोन सुपर ओव्हर सामन्यांतील विजयाचा देखील समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच टी-२० क्रिकेट सोडणारा अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानने एकूण ५२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात संघाचे नेतृत्व केले. त्यात त्याच्या संघाला ४२ सामन्यात विजय मिळाला. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकूण ७२ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात भारतीय संघाला ४२ सामन्यात विजय मिळाला होता.

हेही वाचा – वर्ल्डकपनंतर विराटला बसणार ‘मोठा’ धक्का? आधी टी-२० संघाचं कप्तानपद सोडलं आणि आता…

मॉर्गनला धोनीचा अजून एक विक्रम मोडण्याची संधी आहे. मॉर्गनने आतापर्यंत ६८ टी-२० सामन्यांत इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केले आहे. तर धोनीने ७२ सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. म्हणजेच आणखी ४ सामने खेळून मॉर्गन धोनीचा हा देखील विक्रम मोडू शकतो सोबतच मॉर्गन मधल्या फळीच्या फलंदाजांमध्ये इग्लंडकडून सर्वात जास्त धावा बनवणारा फलंदाज ठरला आहे.

इंग्लंडची श्रीलंकेवर मात

‘अव्वल-१२’ फेरीतील या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १९ षटकांत १३७ धावांत आटोपला. श्रीलंकेचे सलामीवीर पाथुम निसंका (१) आणि कुसाल परेरा (७) लवकर बाद झाले. चरिथ असलंका (२१) आणि भानुका राजपक्षे (२६) यांच्या योगदानानंतर वानिंदू हसरंगा (३४) आणि कर्णधार दसून शानका (२६) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना श्रीलंकेला विजय मिळवून देता आला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eoin morgan become most successful captain in t20 international beat ms dhoni adn