Danish Kaneria on Rumours of Citizenship: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने एक्सवर एक जळजळीत पोस्ट टाकून त्याच्या टिकाकारांना उत्तर दिले आहे. भारतीय नागरिकत्व हवे असल्यामुळे कनेरिया भारतातील अंतर्गत मुद्द्यावर सकारात्मक भाष्य करत आहे, असा आरोप झाल्यानंतर कनेरियाने यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या माझा भारताचे नागरिकत्व मिळविण्याचा कोणताही हेत किंवा प्रयत्न नाही, असे म्हणत त्याने या अफवांना उडवून लावले. तसेच पोस्टच्या अखेर जय श्री राम असा नारा देत, आपण हिंदू असून भारत ही माझी मातृभूमी असल्याचेही ठणकावले.
बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न
पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया हिंदू आहे. नागरिकत्वावर बोलत असताना तो म्हणाला की, पाकिस्तान आणि इथल्या लोकांकडून मला प्रेम मिळाले. या प्रेमाबरोबरच मला पाकिस्तानी यंत्रणा आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भेदभावाची वागणूक देण्यात आली. यात माझे बळजबरीने धर्मांतर करण्याचाही प्रयत्न समाविष्ट आहे.
पाकिस्तान माझी जन्मभूमी
२००० ते २०१० असे एक दशक दानिशने पाकिस्तान क्रिकेटसाठी योगदान दिले. नागरिकत्वाबद्दल बोलताना दानिशने स्पष्ट केले, “पाकिस्तान माझी जन्मभूमी असू शकते. पण भारत माझ्या पूर्वजांची आणि माझी मातृभूमी आहे. माझ्यासाठी भारत मंदिरासारखे आहे. सध्या भारतीय नागरिकत्व मिळविण्याचा माझा कोणताही विचार नाही.”
भविष्यात जर भारताचे नागरिकत्व घेण्याची वेळ आलीच तर त्यासाठी सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) आहेच, असे सांगून भारतीय नागरिकत्व मिळविण्याचे पर्याय आहेतच, असेही दानिशने सांगितले.
“यापुढेही मी धर्माच्या बाजूने उभा राहीन. समाजात फूट पाडणाऱ्या राष्ट्रद्रोह आणि ढोंगी धर्मनिरपेक्षतेला उघड करत राहिल, असेही दानिश म्हणाला. तसेच माझ्या सुरक्षेची काळजी करू नका. प्रभू श्री रामाच्या आशीर्वादामुळे मी माझ्या कुटुंबासह सुरक्षित आणि आनंदी आहे. माझे भाग्य प्रभू रामाच्या हातात आहे. जय श्री राम”, असे म्हणत दानिशने टिकाकारांचा समाचार घेतला.
संघाच्या कामाचे केले कौतुक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त दानिश कनेरियाने एक्सवर पोस्ट शेअर करत संघाचे कौतुक केले होते. मी संघाचे काम पाहिले आहे. ते अनेक ठिकाणी मदतकार्य करतात. गरजूंना आधार देतात, तरूणांना सक्षण करतात, असे कनेरियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.