इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी सुरू आहे. खेळांच्या पाचव्या दिवशी (२ ऑगस्ट) भारताने लॉन बॉल्स खेळामध्ये ‘ना भूतो ना भविष्यती’ कामगिरी केली आहे. भारतीय महिला लॉन बॉल्स संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण पदक पटकावले आहे. लवली चौबे, रूपा राणी टिर्की, पिंकी आणि नयनमोनी सैकिया या चौघींनी शानदार कामगिरी करून इतिहास घडवला. या चौघींनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लॉन बॉल्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळाल्याने अचानक हा खेळ प्रकाशझोतात आला आहे. अनेकांनी पहिल्यांदाच या खेळाचे नाव ऐकले आहे. कित्येकांच्या मनात, हा खेळ नेमका काय आहे? तो कसा खेळला जातो? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शेकडो वर्षांचा इतिहास

लॉन बाल्स हा खेळ काही नवीन नाही. या खेळाचा उगम १२व्या शतकात झाला असे मानले जाते. सर्वात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये हा खेळ खेळला गेल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. १८व्या शतकामध्ये या खेळाशी संबंधित नियम बनवले गेले. काळाच्या ओघात या नियमांमध्ये बदल होत गेले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीपासून (१९३०) नियमितपणे हा खेळ खेळवला गेला आहे. केवळ १९६६मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. राष्ट्रकुल क्रीडा सपर्धेतील नियमित क्रीडा प्रकार असूनही लॉन बॉल्सला अद्याप ऑलिंपिकमध्ये स्थान मिळालेले नाही. भारतातही हा खेळ अनेक दशकांपासून खेळला जात आहे. २०१० पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय लॉन बॉल्स खेळाडूंनी पहिल्यांदा सहभाग घेतला होता.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासामध्ये इंग्लंडने या खेळात वर्चस्व राखले आहे. त्यांनी आतापर्यंत २० सुवर्ण, ९ रौप्य आणि २२ कांस्य अशी एकून ५१ पदके जिंकली आहेत. २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकली होती.

हेही वाचा – CWG 2022: धक्कादायक! स्पर्धा सुरू असताना भारतीय सायकलपटूच्या अंगावरून गेली सायकल

कसे असते स्वरूप

लॉन बाल्स हिरवळ असलेल्या सपाट पृष्ठभागावर खेळला जातो. या खेळाला ‘आउटडोअर बाल्स’ असेही म्हणतात. यात चार फॉरमॅट्स आहेत – सिंगल्स, पेअर्स, ट्रिपल्स आणि फोर्स. संघातील खेळाडूंच्या संख्येनुसार सर्व फॉरमॅटची नावे दिली गेली आहेत. एका लॉन बॉल्स गेममध्ये फक्त दोन संघ सहभागी होऊ शकतात. एका बॉलचे वजन साधारण १.५ किलोग्रॅम इतके असते.

असे असतात नियम

१) या खेळामध्ये आपला बॉल निश्चित केलेल्या लक्ष्याच्या जवळ आणावा लागतो. या लक्ष्याला ‘जॅक’ असे म्हणतात. खेळाडू जेव्हा बॉल फेकतो तो घरंगळत जॅकपर्यंत गेला पाहिजे.

२) एका टोकापासून विरुद्ध टोकाकडे असलेल्या जॅककडे जाताना किमान २३ मीटरचा प्रवास करावा लागतो.

३) प्रत्येक संघ आपापले बॉल्स रोल करण्यासाठी एक वळण घेतो. सिंगल्स फॉरमॅटमध्ये प्रत्येक संघाला चारवेळा प्रयत्न करता येतात. तर इतर फॉरमॅटमध्ये, एका संघाला प्रति खेळाडू दोन थ्रो मिळतात. चार खेळाडूंच्या (फोर्स) फॉरमॅटमध्ये, प्रत्येक संघाला एका टोकापासून आठ थ्रो किंवा रोल्स टाकावे लागतात.

४) जो संघ किंवा खेळाडू जॅकच्या सर्वात जास्त जवळ जातील त्यांना जास्त गुण मिळतात.

५) विजेता ठरवण्यासाठी गुणांची गणना केली जाते. एकेरीत, २१ गुणांपर्यंत पोहोचणारा पहिला खेळाडू सामना जिंकतो. उर्वरित फॉरमॅटमध्ये, बॉल्स १८ वेगवेगळ्या टोकांपासून आणले जातात. यापैकी सर्वात जास्त चांगले थ्रो करणाऱ्या संघाला विजेता म्हणून घोषित केले जाते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is lawn bowls know the history and rules vkk