एपी, मँचेस्टर

मार्कस रॅशफोर्डने केलेल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर मँचेस्टर युनायटेड संघाने ‘एफए’ चषक फुटबॉलमध्ये एव्हर्टनवर ३-१ असा विजय साकारला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच मँचेस्टर युनायटेडने आक्रमक सुरुवात केली. चौथ्याच मिनिटाला अॅन्टनीने एव्हर्टनच्या बचावफळीला भेदत गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी संघाला फार काळ टिकवता आली नाही. एव्हर्टनच्या कोनोर कोडीने (१४व्या मिनिटाला) गोल झळकावत सामना बरोबरीत आणला. यानंतर मध्यंतरापर्यंत ही बरोबरी कायम होती.

उत्तरार्धात, मँचेस्टरने आक्रमक खेळ केला. त्यामुळे प्रतिस्पर्धी एव्हर्टन संघ दबावाखाली आला. संघाला बरोबरी साधून देणाऱ्या कोडीने केलेल्या स्वयंगोलमुळे मँचेस्टरला २-१ अशी आघाडी मिळाली. यानंतर पुन्हा एव्हर्टनचे बरोबरी साधण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, सामन्याच्या भरपाई वेळेत रॅशफोर्डने झळकावलेल्या निर्णायक गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने सामन्यात ३-१ अशी आघाडी घेतली.