फिफा विश्वचषक २०२२ मध्ये जर्मनीचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग थोडा कठीण झाला आहे. जर्मनी आणि २०१० चा चॅम्पियन संघ स्पेन रविवारी (२७ नोव्हेंबर) रात्री उशिरा अल बायत स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या गट-ई सामन्यात १-१ ने बरोबरीत राहिला. विशेष म्हणजे या सामन्यातील दोन्ही गोल बदली खेळाडूंनी केले. स्पेनकडून अल्वारो मोराटाने तर जर्मनीकडून निकलास फुलक्रुगने गोल केले. आता चार वेळचा चॅम्पियन जर्मनीला पुढील फेरी गाठण्यासाठी कोस्टा रिकाला त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल. तसेच स्पेनने जपानला पराभूत करणे अपेक्षित आहे.
दोन्ही बाजूंनी आक्रमक फुटबॉल खेळून खेळाला सुरुवात झाली. स्पेनचे चेंडूवर वर्चस्व होते पण काउंटर अटॅकमध्ये जर्मनीचा संघ धोकादायक दिसत होता. स्पेनचा डॅनी ओल्मो सातव्या मिनिटालाच गोल करण्याच्या जवळ आला, पण जर्मनीचा गोलरक्षक मॅन्युएल न्युएरने उत्कृष्ट सेव्ह करून आशा मोडीत काढल्या. त्यानंतर ३३व्या मिनिटाला फेरान टोरेसलाही गोल करण्याची संधी होती मात्र त्याने चेंडू क्रॉसबारच्या बाहेर पाठवला. दुसरीकडे, अँटोनियो रुडिगरने हेडरद्वारे चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला, परंतु व्हिडिओ असिस्टंट रेफरी (VAR) च्या मदतीने तो गोल ऑफ-साइड घोषित करण्यात आला. परिणामी, पूर्वार्धानंतर दोन्ही संघ ०-० असे बरोबरीत होते.
कालच्या सामन्यात दोन्ही संघांना मध्यांतरापर्यंत गोल करण्यात यश मिळाले नाही. मग उत्तरार्धात ५४ व्या मिनिटाला स्पेनच्या फेरान टोरेसच्या जागी अल्वारो मोराटो मैदानात उतरला. मैदानात उतरताच मोराटानं आपल्या कामगिरीची छाप पाडण्यास सुरुवात केली. सामन्याच्या ६२व्या मिनिटाला जॉर्डी अल्बानं दिलेल्या पासवर अल्वारो मोराटानं गोल झळकावून स्पेनला १-० आघाडी मिळवून दिली. फिफा विश्वचषकात बदली खेळाडू म्हणून सलग दोन सामन्यांत गोल झळकावणारा अल्वारो मोराटा हा आजवरचा केवळ सहावा खेळाडू ठरलाय. तर स्पेनसाठी अशी कामगिरी करणारा मोराटा हा पहिलाच खेळाडू आहे.
जर्मनी वि. स्पेन हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर स्पेनच्या खात्यात ४, तर जर्मनीच्या खात्यात १ गुण जमा आहे. ई गटात स्पेन आणि जर्मनीसोबत जपान आणि कोस्टा रिकाचाही समावेश आहे. जपान आणि कोस्टा रिकाच्या खात्यात प्रत्येकी ३-३ गुण जमा आहेत. त्यामुळे कोणत्या संघाला बाद फेरीचं तिकीट मिळणार हे साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यातच ठरेल. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात स्पेनसमोर जपानचं आव्हान असेल, तर जर्मनीचा सामना कोस्टा रिकाशी होईल. विशेष म्हणजे अखेरच्या सामन्यात स्पेन आणि जर्मनीचा पराभव झाला, तर फिफा विश्वचषकातलं त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या दोन्ही सामन्यांची सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.