फिफा विश्वचषक २०२२ ला कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती आता तो अंतिम टप्यात आला आहे. मोरोक्कोवर २-० ने मात करत गतविजेत्या फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर मेसीच्या अर्जेंटीनाचं आव्हान असणार आहे. १८ तारखेला हा सामना खेळवण्यात येईल. फिफा या स्पर्धेसाठी ३.५ हजार कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वितरित करणार आहे. त्यामुळे कोण होणार ३५० कोटींचा मालक अर्जेंटिना की फ्रान्स याची सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिफाने प्रथमच आखाती देशात विश्वचषक स्पर्धा आयोजित केली. आज आम्ही तुम्हाला फिफा विश्वचषकाशी संबंधित काही अतिशय मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील. येथे आम्ही तुम्हाला खेळाडूंचे शुल्क, फुटबॉल विश्वचषकातील विजयी आणि पराभूत संघ आणि बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम याबद्दल सांगणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या इतर संघांना मिळालेल्या रकमेचीही माहिती देऊ.

३५० कोटींचा मालक कोणता संघ ठरणार फ्रान्स की अर्जेंटिना?

फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला सुमारे ३५० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या संघाला सुमारे २५० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला सुमारे २२० कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला २०४ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. फुटबॉल विश्वचषक २०२२ मध्ये ५व्या ते ८व्या स्थानावर असलेल्या संघांना सुमारे १३८ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. ९व्या ते १६व्या क्रमांकावर असलेल्या संघांना सुमारे १०६ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल आणि १७व्या ते ३२व्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांना सुमारे ७४ कोटी रुपये मिळतील.

हेही वाचा:   FIFA World cup: अर्जेंटिनाच्या मेस्सीला टक्कर देण्यासाठी फ्रान्सचा संघ एमबाप्पे सोबत ‘या’ स्टार खेळाडूला मैदानात उतरवण्याच्या तयारीत

फुटबॉल विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंचे मानधन

ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूंना फी दिली जाते, त्याचप्रमाणे फुटबॉलचे सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी फी दिली जाते. येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की संघातील खेळाडूंना वेगवेगळी मॅच फी मिळते. सध्या खेळाडूंना सर्वाधिक फी देणारा संघ ब्राझील आहे. ब्राझील आपल्या खेळाडूंना एका सामन्यासाठी सुमारे ४.८५ लाख रुपये फी देते. फ्रान्स आपल्या खेळाडूंना ३.३१ लाख रुपये देते. स्पेन आपल्या खेळाडूंना एका सामन्यासाठी सुमारे २.९० रुपये फी देते. त्याचप्रमाणे जर्मनी आपल्या खेळाडूंना सुमारे २.६५ लाख रुपये आणि इंग्लंड सुमारे २.४८ लाख रुपये सामन्याचे मानधन देते.

गोल्डन बूटच्या शर्यतीत कोण आहे पुढे?

कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने मंगळवारी क्रोएशियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात लिओनेल मेस्सीने गोल करत गोल्डन बूटच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आहे. संपूर्ण जगाने आतापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहिले आहेत आणि आता गोल्डन बूटची शर्यतही रोमांचक होत आहे. लिओनेल मेस्सीने क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यातील पहिला गोल करून शर्यतीत आघाडी घेतली. कायलियन एमबाप्पेनेही तितकेच गोल केले आहेत.

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने क्रोएशियाविरुद्ध ३४व्या मिनिटाला पेनल्टी गोलमध्ये बदलून गोल्डन बूटच्या शर्यतीत आगेकूच केली. त्याने आतापर्यंत ५ गोल केले आहेत. फ्रान्सच्या कायलियन एमबाप्पेनेही आतापर्यंत ५ गोल केले आहेत. फिफा विश्वचषक २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला गोल करणाऱ्या एम्बापेने डेन्मार्कविरुद्ध दोन गोल केले. पोलंडविरुद्ध आणखी दोन गोल करून तो शर्यतीत पुढे गेला पण इंग्लंडविरुद्ध त्याला एकही गोल करता आला नाही.

हेही वाचा:   World Cup Finals: भारतीयांना जागरण करण्याची गरज नाही! France Vs Argentina सामना कधी, कुठे, कसा Live पाहता येणार?

मेस्सीशिवाय फ्रान्सचा ऑलिव्हियर गिराऊडही गोल्डन बूटच्या शर्यतीत सामील असून त्याने आतापर्यंत ४ गोल केले आहेत. अर्जेंटिनाचा ज्युलियन अल्वारेझही गोल्डन बूटच्या शर्यतीत ४ गोलांसह चौथ्या स्थानावर आहे. जरी ४ गोल करणाऱ्या खेळाडूला कधीच गोल्डन बूट मिळालेला नाही. २००६ मध्ये थॉमस मुलरने ५ गोल करत हे विजेतेपद पटकावले होते. १९५८ मध्ये, फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेनने १३ गोल केले आणि तो विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू देखील आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup argentina or france who will be the win of 350 crores the property will also be the standard of golden boot avw