नवी दिल्ली : माजी गोलरक्षक आणि कुमार हॉकी संघाचा विद्यमान प्रशिक्षक असलेल्या पी. आर. श्रीजेशने आगामी पाच वर्षांत भारताच्या वरिष्ठ हॉकी संघाचा प्रशिक्षक होण्याची मनीषा व्यक्त केली आहे.
‘‘कुमार संघाबरोबर करताना आगामी काळात मी प्रशिक्षक म्हणून अधिक परिपक्व होईल. सध्या माझ्यासाठी ही जबाबदारी नवीन आहे. कारकीर्दीत २५ वर्षे हॉकी खेळल्यानंतर लगेच प्रशिक्षकाच्या भूमिकेत उतरताना सुरुवातीला कुमार संघाला मार्गदर्शन करणेच योग्य आहे. प्रशिक्षक म्हणून मोठी उडी मारण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टी शिकणे आवश्यक आहे. त्या कुमार संघाबरोबर काम करताना शिकत आहे. मला वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक होण्यास निश्चित आवडेल. मात्र, त्यापूर्वी माझ्या कामात परिपक्वता येणे आवश्यक आहे,’’ असे श्रीजेश म्हणाला.
भारतीय कुमार संघासमोर सध्या विश्वचषक स्पर्धेचे आव्हान आहे. या संघात पदक जिंकण्याची क्षमता असल्याचे सांगून श्रीजेश म्हणाला, ‘‘कुमार किंवा वरिष्ठ गटातील मोठ्या स्पर्धेत अव्वल चारमध्ये यायचे असेल, तर तुम्हाला आधी भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. तुम्ही दडपण योग्य पद्धतीने हाताेला पाहिजे आणि खेळात फार बदल करणेही टाळले पाहिजे.’’
विश्वचषकापूर्वी भारतीय कुमार संघ मलेशियात जोहोर चषक स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला उणिवांवर काम करण्याची चांगली संधी आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा हा शेवटचा टप्पा असेल, असे श्रीजेश म्हणाला.
‘‘प्रशिक्षण, सराव याच्याबरोबर मी खेळाडूंना वलयांकित खेळाडू आणि प्रशिक्षकांची अर्थपूर्ण पुस्तकेही वाचायला देत आहे. यामध्ये ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचा समावेश आहे. माजी बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डनच्या प्रशिक्षकाने हे पुस्तक लिहिले असून, यामध्ये खेळाची आवड, कठोर परिश्रम याविषयी उत्तम लेखन करण्यात आले आहे. आजची पिढी वेगळ्या पद्धतीने विचार करते. त्यामुळे मी हा प्रयोग करत आहे,’’ असे श्रीजेशने सांगितले.
तरुण खेळाडूंना मी व्यायामाची गोडी लावली आहे. यामुळे त्यांना मोबाइलपासून दूर ठेवण्यात मला यश येत आहे. मात्र, मोबाइल फार वेळ दूर ठेवल्यास कधी कधी खेळाडूंची चिडचिड होत असल्याचेही श्रीजेश म्हणाले.
मला वरिष्ठ हॉकी संघाचा प्रशिक्षक होण्यास निश्चित आवडेल. मात्र, त्यापूर्वी माझ्या कामात परिपक्वता येणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा (एफआयएच) प्रशिक्षकपदाचा मी तिसऱ्या श्रेणीचा प्रशिक्षण अभ्यास पूर्ण केला आहे. आणखी पाच वर्षे कुमार संघाबरोबर काम केल्यानंतर मी अनुभवसंपन्न होईन आणि त्यानंतर वरिष्ठ संघाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असेन. – पी. आर. श्रीजेश, कुमार संघाचा प्रशिक्षक