भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप भारतीयांचा जीव घेतला होता. त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदुर राबवण्यात आलं होतं. हे सर्व पाहता, आशिया चषकातील भारत- पाकिस्तान सामना रद्द होणार की काय, अशी चिन्ह होती. पण भारत सरकारने होकार दिल्यामुळे हा सामना १४ सप्टेंबरला दुबईत खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने भारतीय क्रिकेटमधील रणनीती आणि खेळाडूंच्या व्यवस्थापनाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
उमर गुल हा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आहे. त्याने भारतीय क्रीडा संस्कृतीचं कौतुक केलं आहे. गुल म्हणाला, “भारतात खेळाडूंच्या कार्यभार आणि दुखापतींचे व्यवस्थापन अत्यंत बारकाईने केले जाते. जेव्हा एखाद्या गोलंदाजाला दुखापत होते. त्यावेळी त्याच्या गोलंदाजीच्या गतीत घसरण होऊ शकते. पण बुमराहने हे दाखवून दिलं की, योग्य रिहॅब आणि विश्रांती घेतल्यामुळे गोलंदाजीची गती आणि कामगिरी दिर्घकाळ टिकवून ठेवता येऊ शकते.”
गुलने भारतीय क्रिकेटची तुलना पाकिस्तान क्रिकेटशी केली आहे. गुल म्हणाला, “जेव्हा आम्ही खेळायचो, तेव्हा कोणताही वरिष्ठ खेळाडू माघार घ्यायला तयार नसायचा. ७०-८० टक्के फिट असलेला खेळाडूही खेळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचा.” गुलच्या मते, पाकिस्तानमध्ये केवळ खेळाडूंच्या कामगिरीकडे पाहिलं जातं. एखादा नवखा खेळाडू चांगला खेळत असेल, तर त्याला संधी मिळते. पण संघातील अनुभवी खेळाडूंच्या फिटनेसकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे दुखापतग्रस्त होऊनही अनेक वरिष्ठ खेळाडू खेळत राहतात. याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो.
गुलने ही तुलना केवळ भारतीय क्रिकेटचं कौतुक करण्यासाठी केलेली नाही. तर त्याने पाकिस्तान क्रिकेटला आरसा दाखवला आहे. तो म्हणाला, ” रोटेशन आणि रिहॅब हे खेळाडूंसाठी खूप गरजेचं आहे. खेळाडूंना पूर्णपणे फिट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. त्यांना प्राधान्य देणं ही योग्य रणनीती आहे.” जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्याचा भारतीय संघ व्यवस्थापकांकडून योग्यवेळी योग्य वापर केला जातो. महत्वाच्या स्पर्धेआधी त्याला विश्रांती दिली जाते. त्यामुळे तो महत्वाच्या स्पर्धांमध्ये संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतो.