पॅरिस : चौथ्या मानांकित नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि पाचवा मानांकित ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. महिला गटात सातव्या मानांकित टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर, दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का,अमेरिकेची कोको गॉफ, ब्राझीलची बीअट्रिज हद्दाद माइआ तसेच, युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात रुडने चिलीच्या निकोलस जॅरीचा ७-६ (७-३), ७-५, ७-५ असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. मात्र, रुडने अखेर बाजी मारली. तर, त्सित्सिपासने ऑस्ट्रियाच्या सेबॅस्टियन ऑफनेरला ७-५, ६-३, ६-० असे सरळ सेटमध्ये नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्सित्सिपाससमोर अग्रमानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझचे आव्हान असेल.

महिला गटात जाबेऊरने चौथ्या फेरीत अमेरिकेच्या बर्नार्डा पेरावर ६-३, ६-१ असा विजय नोंदवला. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर हद्दाद माइआचे आव्हान असेल. माइआने अन्य सामन्यात पिछाडीवरून पुनरागमन करताना स्पेनच्या सारा सोरिबेस टॉर्मोला ६-७ (३-७), ६-३, ७-५ असे पराभूत केले. सबालेन्काने अमेरिकेच्या स्लोन स्टीफन्सवर ७-६ (७-५), ६-४ असा विजय साकारला. उपांत्यपूर्व तिचा सामना स्वितोलिनाशी होईल. स्वितोलिनाने दारिया कसात्किनाला ६-४, ७-६ (७-५) असे नमवले. तर, गॉफने स्लोव्हाकियाच्या कॅरोलिना श्मीडलोव्हाला ७—५, ६—२ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French open 2023 stefanos tsitsipas reach in quarter final zws