एपी, न्यूयॉर्क

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इटलीच्या यानिक सिन्नेरने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांना सुरुवातीलाच पराभूत व्हावे लागल्याने सिन्नेरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. सिन्नेरनेही अपेक्षेनुसार चमकदार कामगिरी केली.

अमेरिकन स्पर्धेपूर्वी सिन्नेरने सिनसिनाटी स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. मात्र, त्यानंतर सिन्नेर उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळला होता. त्यानंतरही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्याला अमेरिकन स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे कोर्टबाहेर अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा रंगली होती. मात्र, या कुठल्याही प्रसंगाचा सिन्नेरने आपल्या खेळावर परिणाम होऊ दिला नाही आणि हंगामातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

हेही वाचा >>> Paris Paralympics 2024: नीरज चोप्राला जमलं नाही, ते नवदीपने केलं; भालाफेक स्पर्धेत जिंकलं पहिलं सुवर्णपदक, सिमरनला कास्य

अल्कराझ व जोकोविचसारखे खेळाडू लवकर स्पर्धेबाहेर पडल्याचा फायदाही सिन्नेरला झाला. उपांत्य सामन्यात अग्रमानांकित सिन्नेरने ग्रेट ब्रिटनच्या जॅक ड्रॅपरवर ७-५, ७-६ (७-३), ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ड्रॅपरने आपला खेळ उंचावला. त्यामुळे हा सेट टायब्रेकरपर्यंत पोहोचला. मात्र, सिन्नेरने चमकदार कामगिरी करत हा सेटही जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये सिन्नेरने आपली लय कायम राखताना सेटसह सामना जिंकला.

अमेरिकेतीलच दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर होते. त्यामुळे सर्व अमेरिकन चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे होते. फ्रिट्झने पहिला सेट गमावल्यानंतर दुसरा सेट जिंकत बरोबरी साधली. टियाफोने तिसरा सेट जिंकत सामन्यात पुन्हा आघाडी घेतली. यानंतर फ्रिट्झने आपला खेळ उंचावताना पुढील दोन्ही सेटमध्ये विजय नोंदवत सामना जिंकला. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात फ्रिट्झला पाठिंबा असेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेत्या सिन्नेरला चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान असेल.

हेही वाचा >>> Duleep Trophy : एकेकाळी इंग्लंडचा केव्हिन पीटरसन दुलीप ट्रॉफीत ठरला होता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

फ्रिट्झची टियाफोवर मात

फ्रिट्झने आपल्याच देशाच्या २०व्या मानांकित फ्रान्सिस टियाफोला पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत ४-६, ७-५, ४-६, ६-४, ६-१ असे नमवत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. २००६ नंतर प्रथमच अमेरिकेच्या खेळाडूने अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फ्रिट्झपूर्वी अँडी रॉडिक हा अंतिम फेरी गाठणारा अमेरिकेचा अखेरचा पुरुष खेळाडू ठरला होता. त्या वेळी अंतिम सामन्यात त्याला रॉजर फेडररकडून पराभूत व्हावे लागले होते. अमेरिकन टेनिस स्पर्धा जिंकणारा अखेरचा खेळाडूही रॉडिकच होता. त्याने २००३ मध्ये जेतेपद पटकावले होते.

दुसऱ्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाची संधी

या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा सिन्नेर इटलीचा पहिलाच खेळाडू असून, एकाच हंगामात आपली कारकीर्दीमधील दोन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा दुसरा खेळाडू बनण्याची त्याला सर्वोत्तम संधी आहे. यापूर्वी १९७७ मध्ये अशी गुलेर्मो विलासने अशी कामगिरी केली होती. सलग खेळल्यानंतर विश्रांतीची आवश्यकता असल्यामुळे सिन्नेर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी खेळल्यानंतर बोलोंगा येथे होणाऱ्या डेव्हिस करंडक स्पर्धेच्या अखेरच्या साखळी फेरीत इटलीकडून खेळणार नाही.

हा सामना शारीरिकदृष्ट्या थकवणारा होता. मात्र, मी संयमाने खेळ केला. माझ्या मनगटाला खेळताना त्रास झाला, मात्र त्यामध्ये गांभीर्याने घेण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे मी अंतिम सामन्यापूर्वी शांत आहे. – यानिक सिन्नेर

मी इथवर पोहोचण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. टियाफोने चांगला खेळ केला. मात्र, मी सामन्यादरम्यान संयम सोडला नाही. त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीतही मला सर्वोत्तम खेळ करता आला. – टेलर फ्रिट्झ