Gautam Gambhir Wishes Happy Independence Day: आज देशभरात ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. कोट्यावधी भारतीयांसह भारतीय खेळाडूंनी देखील स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. या खास दिवशी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने एक खास पोस्ट शेअर करत देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासह भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वातंत्र्यदिनानिमित्त गौतम गंभीरची खास पोस्ट
राहुल द्रविडचा भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवण्यात आली आहे. गंभीरने आपल्या एक्स अकाऊंटवर भारतीय संघाच्या जर्सीतील एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “माझा देश, माझी ओळख, माझं आयुष्य.. जय हिंद” गंभीरने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गंभीरने बरेच वर्ष तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. भारतीय संघाने २०११ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. या सामन्यातही गंभीरने ९७ धावांची अतिशय महत्वाची खेळी केली होती.
स्वातंत्र्यदिनानिमित्त सचिन तेंडुलकरची खास पोस्ट
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करून स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता, त्याने तिरंगा हाती असलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले की, ” स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… जय हिंद.” सचिनने शेअर केलेली ही पोस्ट देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीरसह बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे .बीसीसीआयने भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हाती तिरंगा झेंडा असलेला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी, “सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा” असं लिहिलं आहे.