IND vs AUS Gautam Gambhir Reaction on Rohit-Virat Partnership: भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिका २-१ ने गमावली. पण या मालिकेत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि तो मालिकावीरही ठरला. याशिवाय अखेरच्या सामन्यात रोहित-विराटने उत्कृष्ट भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यानंतर आता पहिल्यांदाच गौतम गंभीरची याबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे.
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या अखेरच्या सामन्यातील १६८ धावांच्या भागीदारीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तर पहिल्या डावात भारताच्या गोलंदाजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. रोहित शर्माने या सामन्यात शतक झळकावत नाबाद १२१ धावांची खेळी केली, तर विराट कोहलीने ७४ धावांची खेळी केली. रोहित-विराटच्या खेळीनंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया काय आहे, याकडे चाहत्यांच्या नजरा होत्या.
बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीजचा मेडलचा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये सुरूवातीला गौतम गंभीरने संघाच्या कामगिरीचं आणि विशेष म्हणजे हर्षित राणाचं कौतुक केलं. ज्याने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या.
गौतम गंभीर हर्षित राणाबद्दल काय म्हणाला?
गौतम गंभीर म्हणाला, “गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. १० षटकांत बिनबाद ६३ धावा अशी ज्यापद्धतीने ऑस्ट्रेलियाने सुरूवात केली होती आणि त्यानंतर त्यांना २३७ धावांवर रोखणं, हा एक कमालीचा प्रयत्न होता. खास म्हणजे हर्षित राणा, हर्षित शानदार स्पेल टाकली. मी जसं म्हटलं होतं, नम्र राहा आणि मेहनत करत राहा. हा शेवट नाही, फक्त सुरुवात आहे.”
“फलंदाजीबाबत बोलायचं तर शुबमन व रोहितमधील ६० धावांची भागीदारी महत्त्वाची होती. त्यानंतर रोहित व विराटमधील भागीदारी कमालीची होती आणि खास उल्लेख म्हणजे रोहितचं कौतुक त्याने अजून एक शतकी खेळी केली आणि महत्त्वाचं म्हणजे तू सामना जिंकून देत परतलास”, असं कोच गौतम गंभीर म्हणाला.
भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच एड्रियन ले रॉक्स यांनी इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरिजचा विजेता घोषित केला. एड्रियन म्हणाले, इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरिजचा विजेता एक खास खेळाडू, एक उत्कृष्ट नेता याच्याशी सर्वच जण सहमत असतील व एक अनुभवी खेळाडू रोहित शर्मा. रोहित शर्माला भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेसाठी इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीजचं मेडल मिळालं.
