भारताच्या गीता फोगटने दोहा येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली, मात्र पुरुषांमध्ये हितेंदर बेनीवाल याचे पदक हुकले. गीता हिने ५८ किलो गटात व्हिएतनामच्या तिलोन निग्वेन हिच्यावर सहज विजय मिळविला. तिने या सामन्यात चार तांत्रिक गुणांसह नऊ गुणांची कमाई केली. तिच्या आक्रमक खेळापुढे निग्वेन हिला फारसा प्रभाव दाखविता आला नाही.
गीता हिने पहिल्या फेरीत उजबेकिस्तानच्या सलोमात कुचीमोवा हिच्यावर ११-० असा दणदणीत विजय मिळविला. पाठोपाठ तिने चीनच्या तिंग झांगझुओ हिला ६-४ असे हरविले. मात्र नंतर उपान्त्य फेरीत तिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या काओरी इचो हिच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत गीताला एकही गुण मिळविता आला नाही. इचो हिने आठ तांत्रिक गुणांसह पंधरा गुण मिळवीत एकतर्फी लढत जिंकली. गीता हिला त्यानंतर रिपेज फेरीद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली व या संधीचा लाभ घेत तिने पदकावर नाव कोरले.
हितेंदरला १२५ किलो गटामध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत कझाकिस्तानच्या एआल लाझारेव्हने सहज हरविले. लाझारेव्ह याने आठ तांत्रिक गुणांसह १३ गुणांची कमाई केली. भारताच्या राहुल आवारे (५७ किलो), रजनीश दलाल (६५ किलो) व सोमवीर (८६ किलो) यांनी आपापल्या गटात निराशाजनक कामगिरी केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
आशियाई कुस्ती स्पर्धेत गीता फोगटला कांस्य
भारताच्या गीता फोगटने दोहा येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली,

First published on: 08-05-2015 at 12:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Geeta phogat wins bronze in asian wrestling championship