जागतिक हॉकी लीगच्या तिसऱ्या फेरीच्या लढतीत जर्मनीच्या महिला संघाने भारताचा ७-१ असा धुव्वा उडवला. अतिशय आक्रमक आणि वेगवान जर्मन संघाने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला.
जर्मनीकडून मेइक स्टॉकेलने सर्वाधिक दोन गोल केले. जेन म्युलर-वाइलँड, मेरी मॅव्हर्स, जेनिफर प्लास, ल्याडिया हास आणि हनाह क्रुगर यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारतातर्फे वंदना कटारिया हिने एकमेव गोलची नोंद केली. क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या जर्मनीला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी दोनचे त्यांनी गोलमध्ये रूपांतर केले. १२व्या क्रमांकावरील भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. सलग दुसऱ्या पराभवासह भारतीय संघ एका गुणासह गटात शेवटच्या स्थानी पोहोचला आहे.