टेनिस संघटना व खेळाडू यांच्यात निर्माण झालेली कटुता दूर करण्याची संधी भारतीय संघास इंडोनेशियाविरुद्ध होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीद्वारे मिळणार आहे. ही लढत ५-० अशी जिंकून भारतीय खेळाडूंनी टेनिसमध्ये देशाची प्रतिमा पुन्हा उंच करण्याची हुकमी संधी साधली पाहिजे. हे मत व्यक्त केले आहे ज्येष्ठ डेव्हिसपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नंदन बाळ यांनी.
भारत व इंडोनेशिया यांच्यात बंगळुरु येथे ५ ते ७ एप्रिल या कालावधीत आशियाई-ओशेनिया गटाची पहिल्या फेरीची लढत होणार आहे. भारतास नुकत्याच झालेल्या डेव्हिस लढतीत दक्षिण कोरियाविरुद्ध १-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर इंडोनेशियाविरुद्धची लढत भारतास अतिशय महत्त्वाची आहे. नंदन बाळ यांनी डेव्हिसपटू, डेव्हिस संघाचे प्रशिक्षक, राष्ट्रीय प्रशिक्षक आदी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आगामी लढतीविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत.
इंडोनेशियाविरुद्ध होणाऱ्या लढतीत भारताचे निर्विवाद वर्चस्व राहील असे तुम्हास वाटते काय?
नक्कीच. एक तर सोमदेव देववर्मन व युकी भांब्री हे दोन्ही खेळाडू पुन्हा भारतीय संघात आले आहेत. लिएंडर पेस हा तर दुहेरीत अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. कोणत्याही जोडीदाराला घेऊन विजय मिळविण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. भारताच्या तुलनेत इंडोनेशियाचा संघ कमकुवत असल्यामुळे ही लढत भारताने ५-० अशीच जिंकली पाहिजे. असा विजय मिळवित संघटनेबरोबरचे मतभेद हे मैदानावर विसरले जातात हे त्यांनी दाखवून दिले पाहिजे.
घरच्या मैदानावरील सामन्याचा फायदा भारतास किती होणार आहे?
ही लढत सिंथेटिक कोर्ट्सवर होणार आहे. अशी मैदाने सगळीकडेच असतात. सोमदेव व भांब्री यांच्याकरिता असे मैदान म्हणजे हुकमत गाजविण्याचे मैदान असणार आहे. डेव्हिसकरिता प्रेक्षकांचा सहभाग मर्यादितच असतो. त्यामुळे त्यांची उपस्थिती प्रेरणादायक असली तरी अनुकूल मैदान ही भारताची जमेची बाजू असेल.
इंडोनेशियाकडून कितपत लढत मिळण्याची शक्यता आहे?
खरंतर भारताने प्रत्येक सामना एकतर्फी जिंकला तर मला नवल वाटणार नाही. मात्र चिवट झुंज देण्याबाबत इंडोनेशियाचे खेळाडू ख्यातनाम आहेत. त्यामुळेच ते शेवटपर्यंत भारतीय खेळाडूंना लढत देण्याचा प्रयत्न करतील. अर्थात या लढतीत भारताचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
या लढतीकरिता संघाच्या व्यूहरचनेविषयी तुमचे काय मत आहे?
कोरियाविरुद्ध पेसच्या साथीत खेळणाऱ्या पुरव राजा याला इंडोनेशियाविरुद्ध संधी द्यायला पाहिजे होती. त्याने कोरियाविरुद्ध अतिशय चांगले कौशल्य दाखविले होते. केवळ एका सामन्यापुरती निवड करीत त्याला बाजूला करणे हे त्याच्या कारकीर्दीस मारक ठरण्याची शक्यता आहे. सोमदेव व युकी हे एकेरीचे सामने खेळणार आहेत. लढतीमधील पाचव्या खेळाडूस एकेरीचा सामना खेळण्याची संधी असते. सोमदेव व युकी हे एकेरीचे प्रत्येकी दोन्ही सामने खेळण्याइतके पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत त्यामुळे परतीच्या एकेरीत सनमसिंग याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
डेव्हिस लढतीबाबत नेहमीच तात्पुरता विचार केला जातो असे तुम्हास वाटते काय?
होय. आपल्याकडे नेहमीच तत्कालीन लढतीचा विचार केला जातो. डेव्हिसच्या लढती तीन-तीन महिने अगोदर निश्चित होतात. त्यामुळे अशा लढतींकरिता योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. अनेक वेळा खेळाडूंना वेळेवर कीट्स न मिळाल्याचे प्रसंगही घडले आहेत. जर्सी वेळेवर मिळत नाहीत. संघनिवडीबाबतही दूरदृष्टी दाखविली पाहिजे. पहिल्या फळीइतकीच दुसरी फळीही तितकीच बलवान असणे जरुरीचे आहे. म्हणजे कोणीही संघटनेस ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आपल्याशिवाय संघ होऊ शकत नाही ही भावना या खेळाडूंमध्ये राहणार नाही. पहिल्या फळीतील खेळाडूंनी खेळण्यास असमर्थता दाखविली तर दुसऱ्या फळीतील खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळू शकेल.
खेळाडूंनी स्थापन केलेली संघटना व त्यांच्या मागण्यांविषयी तुमचे काय मत आहे?
खेळाडूंच्या मागण्या अयोग्य आहेत असे म्हणता येणार नाही. कोणतेही प्रश्न सामोपचाराने सोडविले जाऊ शकतात. खेळाडूंची संघटना हा प्रयोग यापूर्वीही झाला होता. स्वत:करिता संघटनेस पर्यायाने वेठीस धरणे चुकीचे आहे. खेळाडूंनी देशहित हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. कारण देश आहे म्हणून आपण आहोत.