एरव्ही गटांगळ्या खाणाऱ्या भारतीय हॉकी गेल्या काही आठवडय़ांपासून चर्चेचा विषय बनली आहे. भारतीय हॉकीने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची शिखरे गाठण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, भारताच्या पुरुष आणि महिला संघांबरोबरच कनिष्ठ संघांनीही यशस्वी कामगिरी करून परदेशात तिरंगा फडकावला आहे. भारतीय हॉकीची ही भरारी सुखावह आहे. पण ही सोनेरी युगाची नांदी आहे की यशाचे मृगजळ?
१९७०च्या दशकापर्यंत भारतीय हॉकी जगातील सर्वोत्तम मानली जायची. पण हिरवळीवरून अॅस्ट्रोटर्फ या संक्रमणाच्या काळानंतर भारतीय हॉकीची पिछेहाटच होत गेली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपियन देशांनी हॉकीचे तंत्र ज्या पद्धतीने आत्मसात केले, त्यात भारत बराच मागे पडला. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. पदक तर दूरचीच गोष्ट. हॉकी विश्वचषक स्पर्धेतही भारताची तीच अवस्था. आतापर्यंत १२ विश्वचषक स्पर्धा झाल्या. या बाराही स्पर्धामध्ये भारतासह नेदरलँड्स, जर्मनी, स्पेन आणि पाकिस्तान या संघांनी थाटात स्थान मिळवले. १९७१नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानची या स्पर्धेतून गच्छंती झाली. पण भारताला या स्पर्धेचे तिकीट निश्चित करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ओशियाना चषक स्पर्धेवर अवलंबून राहावे लागणार आहे. कोणत्याही स्पर्धेत एखाद्या राजाप्रमाणे ऐटीत स्थान मिळवणाऱ्या भारतीय हॉकीची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हे यावरून दिसून येते.
भारताने आतापर्यंत स्पेनचे जोस ब्रासा, ऑस्ट्रेलियाचे रिक चाल्सवर्थ, जर्मनीचे गेरार्ड रॅच आणि ऑस्ट्रेलियाचे मायकेल नॉब्स हे चार परदेशी प्रशिक्षक अनुभवले. प्रत्येकाने भारतीय हॉकीला यशाचा मार्ग दाखवण्याचे आश्वासन दिले. पण भारतीय हॉकी नेहमीप्रमाणेच गाळात रुतत गेली. जुलै महिन्यात नॉब्स यांना खराब कामगिरीच्या कारणावरून नारळ देण्यात आल्यानंतर भारतीय हॉकीने मात्र गरुडझेप घेतली. भारतीय पुरुष संघाला आशिया चषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारताला विश्वचषकात थेट स्थान मिळवता आले नाही. त्यानंतर भारताच्या युवा संघाने सुलतान जोहोर चषक हॉकी चषकाला गवसणी घातली. महिलांनीही पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवत आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याची करामत केली. महिलांच्या कनिष्ठ संघाने ऐतिहासिक कामगिरी करत ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदकावर मोहोर उमटवली. कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतील भारताचे हे एकमेव पदक ठरले.
भारतीय संघ आतापर्यंत आक्रमणात कमी पडत होता. परदेशी प्रशिक्षकांनी भारताला आक्रमक हॉकीचे तंत्र शिकवण्याचे बरेच प्रयत्न केले. एक-दोन सामन्यांत आक्रमकपणा दाखवल्यानंतर भारताची आक्रमकपणाची धार बोथट होत होती. पण गेल्या काही सामन्यांत भारताने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून सर्वाची वाहवा मिळवली आहे. बचावात्मक खेळ ही भारतीय हॉकीची ताकद समजली जायची. पण याच बचावात मात्र ढिसाळपणा येऊ लागला आहे. मॅन टू मॅन पासिंग, चेंडूवर नियंत्रण मिळवणे, पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करणे या गोष्टींवर भारताला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे. गोलरक्षकाची कामगिरी ही भारतापुढील प्रमुख समस्या असायची. पण पी. आर. श्रीजेश आणि पी. टी. रावसारखे चांगले गोलरक्षक भारताला मिळाले आहेत. मनदीप सिंग, अमित रोहिदास आणि रमणदीप सिंग यांच्यासारखे युवा खेळाडू वरिष्ठ संघातूनही चमकत आहेत. युवा संघाचे लक्ष लागले आहे ते मायदेशात डिसेंबरमध्ये होणारी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धा जिंकण्याकडे. युवा खेळाडूंची तंदुरुस्ती याचा लाभ घेण्याची गरज आहे. तसेच काही दिवसांत भारतीय संघाला नवा परदेशी प्रशिक्षक मिळणार आहे, याचा फायदा उठवत भारतीय संघाने पुढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामधून २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे.
हॉकीतील सुवर्णयुगाची अनुभूती देणारा पुरुषांचा संघ यशाची शिखरे गाठत असताना महिला संघाला मात्र गरुडभरारी घेता आली नव्हती. महिला संघाला अद्याप ऑलिम्पिकचे दरवाजेही ठोठावता आले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत महिला संघाकडे कुणी गांभीर्यानेसुद्धा पाहिले नव्हते. पण महिला खेळाडू आता कात टाकत आहेत. आतापर्यंत भारताच्या मुलींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर थोडेथोडके यश मिळवले होते. पण बलाढय़ संघावर मात करून महिला संघाने आपल्यातील गुणवत्ता दाखवून दिली आहे. पण भारताला अल्पसंतुष्ट राहून चालणार नाही. पण आशिया स्तरावर चमक दाखवण्याऐवजी किंवा कनिष्ठ ज्युनियर स्पर्धेतील कांस्यपदकावर समाधानी न होता महिला संघाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही कामगिरी उंचवावी लागणार आहे. कनिष्ठ संघातील अनेक जणींनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आता हीच पिढी भारताला यशोशिखरावर पोहोचवेल, अशी आशा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2013 रोजी प्रकाशित
सोनेरी युगाची नांदी?
एरव्ही गटांगळ्या खाणाऱ्या भारतीय हॉकी गेल्या काही आठवडय़ांपासून चर्चेचा विषय बनली आहे. भारतीय हॉकीने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची शिखरे गाठण्यास सुरुवात केली आहे.

First published on: 10-10-2013 at 05:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good time for indian hockey